पुण्यातून गावासाठी पहिली बस रवाना, MPSC च्या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 04:10 PM2020-05-07T16:10:08+5:302020-05-07T16:12:01+5:30
एमपीएससी समनव्य समितीने महाराष्ट्र राज्य या ट्विटर अकाऊटने ट्विट केले होते की, अमित ठाकरे यांनी आमच्याशी फोन वरून चर्चा करून आमची विचारपूस केली.
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. या पत्राद्वारे अमित ठाकरे यांनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सगळ्या रुग्णालयांना जोडून एक अॅप तयार करण्याची मागणी केली होती. आता, पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्नाबाबत अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर, आज पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी पहिली बस रवान झाली आहे. एमपीएससी समनव्य समिती महाराष्ट्र राज्य यांनी ट्विट करुन यासंबंधित माहिती दिली आहे. तसेच, मनसेचे नेते अमित ठाकरे आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांचे आभारही मानले आहेत.
एमपीएससी समनव्य समितीने महाराष्ट्र राज्य या ट्विटर अकाऊटने ट्विट केले होते की, अमित ठाकरे यांनी आमच्याशी फोन वरून चर्चा करून आमची विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना फोन करुन बसेसची सोय करून विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात यावे अशी विनंती केली. उद्धव ठाकरेंनी देखील येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात येईल असं आश्वासन दिल्याचे समनव्य समितीने सांगितलं होतं. त्यानंतर, समन्वय समितीने आणखी एक ट्विट करुन पुण्यातून विद्यार्थ्यांची पहिली बस रवाना झाल्याची माहिती दिली. तसेच, बसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचा एक फोटो शेअर करत, मनसेचे नेते अमित ठाकरे आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे आभारही मानले आहेत.
#punestudents@yadravkar व #अमितठाकरे आज आपल्या प्रयत्नांनामुळे लालपरी विध्यार्थ्यांना घेऊन घरी चालली. आम्हास खात्री आहे पुण्यातील प्रत्येक विध्यार्थी जो पर्यंत जाणार नाही तो पर्यंत आपण नक्कीच पाठपुरावा करणार सलाम आपल्याला@abpmajhatv@TV9Marathi@mnsadhikrut@harshdudhe_MT#मpic.twitter.com/DIqD4UUlwK
— Mpsc समन्वय समिती महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) May 7, 2020
आज आपल्या प्रयत्नांनामुळे लालपरी विद्यार्थांना घेऊन घरी चालली. आम्हास खात्री आहे ,पुण्यातील प्रत्येक विद्यार्थी जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत आपण नक्कीच पाठपुरावा करणार. सलाम आपल्याला, असे ट्विट एमपीएससी समन्वय समितीने केले आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅडलवरुन हा फोटो शेअर करत हे रिट्विट करण्यात आले आहे. या बसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन केल्याचे दिसून येत आहे. तर, तब्बल ४५ दिवसांच्या लॉकडाऊननंतर आपण गावी जात असल्याचा आनंदही त्यांच्या मास्क लावलेल्या चेहऱ्यावर दिसत आहे. दरम्यान, अद्यापही पुण्यात हजारो विद्यार्थी गावकडे जाण्याची वाट बघत आहेत. मात्र, पहिली बस सुटल्यामुळे आता आपणही लवकरच गावी पोहोचणार, असा आशावाद त्यांच्यात निर्माण झाला आहे. त्यामुळेच, पहिली बस रवाना झाल्यानंतर पुण्यातील सर्वच विद्यार्थ्यांना मोठा आनंद झाला आहे.