ईडीकडून खडसेंविरोधात पहिले दोषारोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:06+5:302021-09-04T04:11:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुण्याच्या भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी ईडीने विशेष न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्याच्या भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी ईडीने विशेष न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात पहिले दोषारोपपत्र दाखल केले. एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी आणि अन्य दोन कंपन्यांविरोधात १००० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ईडीच्या आरोपपत्रात तत्कालीन उपजिल्हाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी यांचा जबाब आणि जमिनीच्या विक्रीसंदर्भात निर्णय घेताना संबंधित जमिनीचा ताबा असलेल्या लोकांशी बैठका घेण्यात आल्या, त्या लोकांच्या जबाबाचाही समावेश आहे.
भोसरी एमआयडीसीच्या भूखंडाचे बाजार मूल्य ३१ कोटी असताना खडसे व त्यांच्या जावयाने हा भूखंड ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केला. वादग्रस्त भूखंड चौधरी यांच्या नावे खरेदी करण्यात आला. मात्र, खरेदीचे पैसे पाच बनावट कंपन्यांद्वारे देण्यात आले. खडसे आणि चौधरी यांच्या यामधील भूमिकेचा तपास ईडी करत होती.
ईडीच्या म्हणण्यानुसार, भूखंड खरेदीसाठी काही कंपन्यांकडून कर्ज घेतल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे. याबाबत तपास केला असता, हा निधी पाच बनावट कंपन्यांकडून आल्याचे उघडकीस आले.
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी, अब्बास उकानी यांच्याविरोधात ईसीआयआर दाखल केला. उकानी हा भूखंडाचा मूळ मालक आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन महसूल मंत्री खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला. त्यांनी भूखंडाची मूळ किंमत कमी करून भूखंड कमी दरात खरेदी केला. त्यामुळे सरकारी तिजोरीला ६१.२५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागले.
गेल्या महिन्यात ईडीने खडसे, मंदाकिनी खडसे आणि चौधरी यांनी एकूण ५.७३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.