मुंबई : कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याऐवजी मुंबई विद्यापीठाचा ब्रँडच अधिक विकसित आणि सशक्त करावा आणि मुंबई विद्यापीठावरील प्रशासकीय ताण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, कल्याण या ठिकाणी जिथे कमी वेळेत उपकेंद्र सुरू होऊ शकते, त्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिल्या. याआधी स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी सचिव पातळीवर समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्यानंतर विद्यार्थी-प्राचार्यांमधील या संदर्भातील मतमतांतरे त्यांनी जाणून घेतली. यामधील ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी, प्राचार्यांनी मुंबई विद्यापीठालाच आपली पसंती दर्शविली असल्याने आपण मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतच इतर उपकेंद्रांना अधिक सशक्त करून ताण कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाशी ८२६ महाविद्यालये संलग्न असून एवढ्या महाविद्यालयांमुळे प्रशासनावर ताण पडत असल्याचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. कोकणातील महाविद्यालयांना अनेकदा कामांसाठी मुंबई गाठणे जिकिरीचे होते. त्यातून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करण्यात येत होती. कोकण विद्यापीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चाही झाली आणि या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी कोकणात स्वतंत्र विद्यापीठ असावे यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना मंत्र्यांकडून देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांची, पालकांची प्रत्यक्ष मते जाणून घेताना देशातील मोठ्या विद्यापीठांच्या यादीतील मुंबई विद्यापीठालाच पसंती दर्शविली जात असल्याने मुंबई विद्यापीठाचेच सक्षमीकरण करून दर्जावाढ करण्याचे निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
व्हर्च्युअल स्टुडिओ स्थापन करणारमुंबई विद्यापीठात व्हर्च्युअल स्टुडिओ स्थापन करणार असून मुंबई विद्यापीठातील पीएचडी प्राध्यापकांची एक टीम या उपकेंद्रांतील विद्यार्थ्यांना धडे देणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. यासाठी उपकेंद्रांतील प्राध्यापकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्राध्यापक विद्यार्थ्यांशी या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधून संवाद साधतील. यामधून उपकेंद्रांतील आयक्यू लेव्हल वाढविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले.