मुंबईत मान्सूनला फर्स्ट क्लास; ६१ टक्क्यांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 03:06 PM2020-09-10T15:06:01+5:302020-09-10T15:06:37+5:30
१२ टक्के मान्सूननंतरही अकोला, अमरावती, यवतमाळ तहानलेलेच
मुंबई : १ जूनपासून १० सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत १२ टक्के अधिक मान्सूनची नोंद झाली आहे. या काळात ८९०.२ मिमी एवढया पावसाची नोंद होते. यावेळी ही नोंद १ हजार १.१ मिमी एवढी झाली आहे. दुसरीकडे राज्यात अजून तीन जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत असून यात अकोला, अमरावती आणि यवतमाळचा समावेश आहे. या तिन्ही जिल्हयात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.
जुन आणि जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. राज्यात पाऊस ब-यापैकी बरसला आहे. मुंबई शहर, अहमदनगर आणि औरंगाबादमध्ये ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबईच्या उपनगरात ५९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, बीड, जालना, जळगाव, धुळे या जिल्हयांत २० टक्क्यांहून अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. ठाणे, सातारा, रायगड, पालघर, नाशिक, नंदूरबार, बुलढाणा, वाशिम, हिंगली, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्हयात सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी मुंबईत ५.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत मुंबईत २ हजार ४८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणारे सातही तलाव ९८.०१ टक्के भरले असून, मुंबईकरांची पाण्याची चिंताही ब-यापैकी मिटली आहे.
पावसाची तूट
अकोला -३०
अमरावती -२४
यवतमाळ -३०
मुंबई शहर ६१ टक्के
मुंबई उपनगर ५९ टक्के