फर्स्ट क्लासचे तिकिट स्वस्त; पास मात्र महागच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 02:17 PM2022-05-04T14:17:46+5:302022-05-04T14:18:12+5:30
१० किमीसाठी एसीचे तिकीट ३५, तर प्रथम वर्गात २५ रुपये
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून उन्हाच्या झळा सोसणाऱ्या मुंबईकरांचा एसीसोबत प्रथम श्रेणीचा लोकल प्रवास स्वस्त करण्यात आला आहे. मात्र मासिक पास ‘जैसे थे’च असल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल आणि सामान्य लोकलच्या फर्स्ट क्लास डब्याच्या दैनंदिन तिकिटात कपात करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
त्यामुळे प्रवाशांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सामान्य लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्याचे तिकीट दर कमी झाले आहेत. १० किमीच्या लोकल प्रवासासाठी फर्स्ट क्लासकरता ५० रुपये मोजावे लागत होते. आता २५ रुपयांत प्रवास करता येणार आहे. तर, एसी लोकलच्या प्रवासासाठी ६५ रुपयांऐवजी ३५ रुपये मोजावे लागणार आहेत.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी फक्त तिकिटांचे दर कमी करण्याची घोषणा केली. मात्र, कोणत्याही लोकलच्या मासिक पासच्या रकमेत कोणताही बदल केला नाही. तसेच, सेकंड क्लासच्या तिकीट किंवा मासिक पासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे.
फेब्रुवारीत डोंबिवली ते भायखळा एसी लोकलचा पास काढला आहे. लोकलच्या तिकिटापेक्षा पासमध्ये सवलत दिली जाते. मात्र, एसी लोकलचे तिकीट कमी झाले असले तरी पास ‘जैसे थे’ आहे. हा पास काढणाऱ्या प्रवाशांवर अन्याय आहे.
सुनील नवले, प्रवासी
एसी लोकलच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे, पण मासिक पास ‘जैसे थे’ आहे. मात्र, एसी लोकलच्या मासिक पासचे भाडे हे ॲप आधारित कॅबच्या तुलनेने कमी आहे. ५३ किमी प्रवासाचा पास असेल तर एका बाजूचा प्रवास खर्च सरासरी ३५ रुपये येतो. हा दर प्रवाशांना परवडणारा आहे.
- वरिष्ठ अधिकारी, मध्य रेल्वे
अंतर | प्रथमश्रेणी मासिक पास | एसी मासिक पास |
कल्याण - सीएसएमटी | ११०५ | २१३५ |
डोंबिवली - सीएसएमटी | ९९० | २०५० |
दिवा - सीएसएमटी | ९१० | १८८० |
ठाणे - सीएसएमटी | ७५५ | १७७५ |
मुलुंड - सीएसएमटी | ७५५ | १७७५ |
घाटकोपर - सीएसएमटी | ५७० | १३२५ |
कुर्ला - सीएसएमटी | ५७० | १३२५ |
दादर - सीएसएमटी | ३४५ | ६२० |
भायखळा - सीएसएमटी | ३४५ | ६२० |