पहिले क्लीन स्ट्रीट फूड हब गिरगाव आणि जुहू चौपाटीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:44 AM2019-03-04T05:44:55+5:302019-03-04T05:45:03+5:30

शहरातील धकाधकीच्या जीवनात अपुऱ्या वेळेअभावी बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याकडे कल वाढत आहे.

First Clean Street Food Hub Girgaum and Juhu Chowpattyar | पहिले क्लीन स्ट्रीट फूड हब गिरगाव आणि जुहू चौपाटीवर

पहिले क्लीन स्ट्रीट फूड हब गिरगाव आणि जुहू चौपाटीवर

Next

मुंबई : शहरातील धकाधकीच्या जीवनात अपुऱ्या वेळेअभावी बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याकडे कल वाढत आहे. अन्नपदार्थांचा दर्जा राखून ग्राहकांना चांगल्या दर्जाचे व पौष्टिक अन्नपदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठी मुंबईतील ‘गिरगाव चौपाटी’ व ‘जुहू चौपाटी’ येथे पहिले क्लीन स्ट्रीट फूड हब तयार करण्यात येणार आहे. अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या हा उपक्रम अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प असून, गुजरातनंतर हा प्रकल्प राबविणारे महाराष्ट्र दुसरे राज्य ठरले आहे.
अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण (नवी दिल्ली) यांनी देशांतर्गत ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने खाद्यपदार्थांची विक्री केली जाते, अशा ठिकाणी ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. नागरिकांना स्वच्छ अन्न मिळावे, त्यासाठी अन्नपदार्थांबरोबर विक्रीचा सभोवतालच्या परिसराची पाहणी करून, तेथील त्रुटी परीक्षणाअंती त्याची पूर्तता केल्यानंतर, त्या ठिकाणास ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा देण्यात येतो. या प्रकारे देशातील पहिले क्लीन स्ट्रीट फूड हब म्हणून गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील ‘कांकरीया लेक’ला घोषित करण्यात आले आहे.
मुंबईमधील प्रसिद्ध चौपाटी म्हणून ओळखली जाणारी ‘गिरगाव चौपाटी’ व ‘जुहू चौपाटी’ यांची निवड प्राधिकरणामार्फत करण्यात आले होती. या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन, महापालिका आणि अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या वतीने संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. अन्नपदार्थ हाताळताना घ्यावयाची दक्षता, तसेच फूड स्टॉलच्या आसपासची स्वच्छता, त्यांची रचना, कचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा निचरा इत्यादी बाबी लक्षात घेऊन सर्वेक्षण करण्यात आले होते, तसेच तेथील फूड स्टॉलधारकांची कार्यशाळा आयोजित करून, त्यांना अन्नसुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
>...म्हणून देण्यात आला हबचा दर्जा
गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटी येथे भेटी देऊन तेथील अन्न विक्रेत्यांची, स्वच्छतेबाबत सर्व नियमांचे पालन होण्यासाठी तपासणी केलेली होती. दोन्ही ठिकाणी क्लीन स्ट्रीट फूड हबसाठी आवश्यक असणाºया सर्व नियमांची पूर्तता होत असल्याने, तसेच अन्न सुरक्षिततेबाबत सर्व निकषांचे पालन होत असून, गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटी यांना क्लीन स्ट्रीट फूड हबचा दर्जा प्राप्त झाला आहे, अशी माहिती अन्न व औषध सुरक्षा प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली.
>उद्या होणार उद्घाटन
गिरगाव चौपाटी येथे ५ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’चे उद्घाटन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट आणि वैद्यकीय विभागातील मान्यवरांची उपस्थिती राहील.

Web Title: First Clean Street Food Hub Girgaum and Juhu Chowpattyar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.