सैनिकांचा सन्मान करणारा देशातील पहिलाच कार्यक्रम मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:44 AM2018-01-22T02:44:43+5:302018-01-22T02:44:58+5:30
संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी झोकून देणा-या आणि जिवाची, कुटुंबीयांची पर्वा न करता देशासाठी शहीद होणा-या लष्करातील सैनिकांचा पहिलाच गौरव सोहळा वरळीत होणार आहे.
मुंबई : संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी झोकून देणा-या आणि जिवाची, कुटुंबीयांची पर्वा न करता देशासाठी शहीद होणा-या लष्करातील सैनिकांचा पहिलाच गौरव सोहळा वरळीत होणार आहे. वरळीच्या अथर्व फाउंडेशनने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. ३१ जानेवारी रोजी वरळी येथील द नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियाच्या डोम सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होईल.
फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला सैनिकांना गौरविणारा हा देशातील पहिलाच भव्य कार्यक्रम आहे. ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना असून या देशाच्या रेजिमेन्ट्समधील आणि बटालियन्समधील १० शूरवीर सैनिकांना कुटुंबीयांसह सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमात हिंदी-मराठी सिनेनाट्यसृष्टीतील कलाकार या सैनिकांची गाथा निवेदनातून उपस्थितांसमोर मांडणार आहेत.
विशेष म्हणजे या १० सैनिकांच्या जीवनावर, त्यांच्या लष्करातील कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणारी ध्वनिचित्रफीतही या सोहळ्यात दाखविण्यात येणार असल्याची माहिती सुनील राणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी अधिक माहिती देताना राणे यांनी सांगितले, आजमितीस वर्षभरात केवळ दोनच दिवशी सैनिकांचे योगदान, लष्कराविषयी सर्व जण बोलतात. मात्र, अन्य वेळेस त्यांच्या योगदानाविषयी समाजाला विसर पडतो. परंतु, हे योगदान प्रचंड मोठे असून आजच्या तरुण पिढीला आणि एकूणच समाजाला त्याची प्रचिती आली पाहिजे. या विचारातून हा प्रवास सुरू झाला आणि मनात बाळगलेली इच्छा आज कित्येक वर्षांनंतर कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारत आहे.
यांची प्रमुख उपस्थिती : या कार्यक्रमाला लष्करातील आजी-माजी अधिकारी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविणार आहेत. याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अभिनेत्री हेमामालिनी, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेत्री शबाना आझमी, ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव, दिग्दर्शक मधुर भांडारकर अशा दिग्गजांचा समावेश आहे.
अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्र मागे
लष्करात सामील होणाºयांमध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी असला तरीही सैनिकांना मिळणाºया सेवा-योजनांबाबत कायमच उपेक्षा होत असल्याचे दिसून आले आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये सैनिकांना मिळणारा निधी आणि महाराष्ट्राचा निधी यात तफावत आहे. त्यामुळे यात वाढ करण्यासाठी फाउंडेशनच्या साहाय्याने प्रयत्न करणार आहे.
‘त्या’ मंडळात सैनिकांचा समावेश करा
राज्यातील सैनिकांच्या योजनांकरिता तयार करण्यात आलेल्या विशेष मंडळात लष्करातील माजी सैनिक हा सदस्य असावा, अशी मागणीही करणार आहोत. जेणेकरून, लष्कराच्या सेवेत असताना वा निवृत्त झाल्यानंतरच्या अडचणी, प्रक्रियेतील विलंब, प्रलंबित मागण्या यांचे गांभीर्य शासकीय यंत्रणांपर्यंत पोहोचेल, असे राणे यांनी सांगितले.
ओळख मिळण्यासाठी ‘ब्लेझर’ तयार करणार
बºयाचदा तिकीट काढण्यासाठी, प्रवासाकरिता, अधिकाºयांच्या भेटीसाठी आजी-माजी सैनिकांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागते. अशा प्रसंगांमध्ये सैनिकांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आजी-माजी सैनिकांना वेगळी ओळख मिळण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करून ‘ब्लेझर’ची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असून या ब्लेझरवर लष्कराचा वेगळा लोगोही असणार आहे. यासाठी पहिले १०० ब्लेझर फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहेत.