पहिल्या दिवशी काढला 17,758 जणांनी रेल्वे पास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 10:59 AM2021-08-12T10:59:32+5:302021-08-12T11:01:11+5:30
लोकलच्या प्रवासासाठी १५ ऑगस्टपासून देण्यात येणाऱ्या पाससाठी कोरोना लसीकरणाची पडताळणी केली जात आहे. पण, आरोग्य सेतूवर माहिती उपलब्ध असताना पडताळणीचा घाट का, असा सवाल प्रवासी विचारत आहेत.
मुंबई : दोन डोस घेतलेल्या नागरिकांचे ओळखपत्र तपासून त्यांना मासिक पास देण्याची कार्यवाही बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत १८ हजारांहून अधिक नागरिकांची पडताळणी पूर्ण झाली. तर पहिल्या सत्रात रेल्वे प्रशासनाद्वारे १७ हजार ७५८ मासिक पासांचे वितरण करण्यात आले.
मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. यानुसार ५३ रेल्वे स्थानकांवर ३५८ मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्थानकांवर भेटी देऊन या प्रक्रियेची पाहणी केली, तसेच ऑफलाइन पडताळणी करताना रेल्वे प्रवासी आणि मदत कक्षावरील कार्यरत कर्मचारी यांना कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, या दृष्टीने काळजी घेण्याचा सल्ला महापौरांनी यावेळी दिला.
आरोग्य सेतूवर माहिती असताना पडताळणीचा घाट का?; प्रवाशांचा सवाल -
मुंबई : लोकलच्या प्रवासासाठी १५ ऑगस्टपासून देण्यात येणाऱ्या पाससाठी कोरोना लसीकरणाची पडताळणी केली जात आहे. पण, आरोग्य सेतूवर माहिती उपलब्ध असताना पडताळणीचा घाट का, असा सवाल प्रवासी विचारत आहेत.
रेल्वे प्रवासी सिद्देश देसाई म्हणाले, कोरोना लसीकरणाची पडताळणी केली जात आहे. लसीकरण केल्याबाबत आरोग्य सेतू ॲपवर सर्व माहिती उपलब्ध आहे. त्या माहितीचा वापर करता आला असता; पण, विनाकारण प्रवाशांचा वेळ वाया घालवला जात आहे. सेतूवर माहिती असताना हा पडताळणीचा घाट का घातला जात आहे? रेल्वे प्रवासी प्रसाद पाठक म्हणाले, आता सर्व कामे पूर्णपणे सुरू झालेली नाहीत. काही जणांना आठवड्यातून एकदा तर काही जणांना तीन - चार वेळा बोलावले जाते. काही जण महिन्यातून एक ते दोन वेळाच बाहेर जातात. असे असताना त्यांनी महिन्याभराच्या पाससाठी पैसे का खर्च करावे.
मदत कक्ष कार्यरत
- पहिल्या सत्रात १७ हजार ७५८ मासिक पास देण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेद्वारे १२ हजार ७७१, तर पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आलेल्या चार हजार ९८७ मासिक पासांचा समावेश आहे.
- दररोज सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सलग दोन सत्रामध्ये मदत कक्ष कार्यरत असणार आहेत. यामुळे विनाकारण गर्दी न करता नागरिकांनी आपल्या घराजवळील रेल्वे स्थानकांवर पडताळणीकरिता जावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
प्रमाणपत्राच्या झेरॉक्समुळे होतो विलंब
मुंबई : लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांच्या कोरोना लसीकरणाची पडताळणी रेल्वे स्थानकावर महापालिकेकडून बुधवारी करण्यात आली. मोबाइलमधील पीडीएफ फाइलवरूनही पडताळणी जलद होत होती. मात्र, जे लोक झेरॉक्स घेऊन आले होते त्यांची प्रत स्कॅनिंग करण्यासाठी उशीर लागत होता.
बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५३ रेल्वे स्थानकांवर ३५८ मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पडताळणीसाठी ज्या नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत, त्यासोबत छायाचित्र ओळखपत्र पुरावा असे दोन्ही दस्तावेज सोबत घेऊन जवळच्या रेल्वे स्थानकावर जाण्याचे पालिकेने आवाहन केले होते.
वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जडयार म्हणाले की, काही रेल्वे स्थानकात लसीकरण पडताळणी उशिरा सुरू करण्यात आली. पहिला दिवस असल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना काही बाबींची कल्पना नव्हती. झेरॉक्सवरून स्कॅनिंग करण्यास वेळ लागत होता.
एकीकडे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाची मुभा असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना तिकीट देण्यात येत नव्हते, तर प्रवासी संजय भाकरे म्हणले की, मी लसीचे दोन डोस घेतले आहेत, पण माझ्या मुलाच्या मोबाइलवरून आरोग्य सेतू ॲपवर बुकिंग केले होते. माझ्या मुलाच्या मोबाइलमध्ये लिंक आहे मी साधा मोबाइल वापरतो. मी आधार कार्ड आणि लसीकरण प्रमाणपत्राची झेरॉक्स आणली पण त्याचे स्कॅनींग झाले नाही. मला परत जावे लागणार आहे.