Join us

‘अ‍ॅम्बिस’ प्रणालीच्या पहिल्याच दिवशी ८५ गुन्ह्यांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 5:39 AM

मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन; साडेसहा लाख गुन्हेगारांचा डाटा उपलब्ध

मुंबई : गुन्ह्यांचा तपास अधिक गतिमान होण्यासाठी राज्यातील सुमारे साडेसहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबूळ इत्यादींचा एकत्रित तपशील आॅनलाइन उपलब्ध करून देणाऱ्या आॅटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सीस्टिम (अ‍ॅम्बिस) या प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या प्रणालीच्या आधारे पहिल्याच दिवशी राज्यभरातील ८५ गुन्ह्यांची उकल झाली.

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात या प्रणालीचा लोकार्पण करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्तालयातील जे. एस. भरुचा सभागृहाचे उद्घाटन, कचरामुक्त मोहिमेचा शुभारंभ आणि मुंबई पोलिसांच्या ‘रक्षक हैं हम’ या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, गृहविभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह उपस्थित होते.गुन्हेगारांची माहिती तत्काळ देतानाच गुन्हे व अपराध सिद्धीचे प्रमाण वाढविण्यास, तसेच गुन्हे तपासात गुणात्मक फरक जाणवतानाच गुन्ह्यांचा शोध ते गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी अ‍ॅम्बिस प्रणाली महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. आधुनिकीकरणाची कास पोलीस दलाने धरली असून, आरोपींचे फिंगर प्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत बदलून आता केवळ बोटांचे ठसेच नाही, तर हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करून ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवल्याने गुन्हेगारांचा माग काढणे सोपे जाईल. त्यामुळे अ‍ॅम्बिस प्रणाली पोलिसांचे गुगल म्हणून नावारूपास येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले की, अ‍ॅम्बिस प्रणाली देशातील पहिली प्रणाली असून, गुन्हेगारांची संपूर्ण माहिती याद्वारे मिळेल. मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांमध्ये पायलट प्रकल्प म्हणून ही प्रणाली राबविली जाईल. आतापर्यंत २०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना या प्रणालीचे प्रशिक्षण दिले आहे. पहिल्याच दिवशी या प्रणालीच्या मदतीने ८५ गुन्ह्यांतील ११४ चान्सप्रिंट मिळाल्या आणि त्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली. भविष्यात गुन्ह्यांची उकल करण्यास याचा आणखी फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.एका क्लिकवर मिळणार आरोपींची माहितीया प्रकल्पांतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये संगणक आणि हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करण्यासाठीची यंत्रसामग्री दिली जाईल. ही यंत्रणा थेट मुख्य डेटाबेसशी जोडलेली असेल. डोळ्यांचे, हातांच्या तळव्यांचे स्कॅन यांचा वापर करून गुन्हेगाराचा अचूक शोध घेण्यास यामुळे मदत होईल. ४१ युनिटमधील १,१६० पोलीस ठाण्यांत ही सुविधा उपलब्ध असेल. २,६०० पोलीस कर्मचाºयांना या प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामुळे एका क्लिकवर आरोपींची माहिती मिळणार आहे. यात फिंगर प्रिंट गोळा करण्यासाठी मोबाइल स्कॅनरचा वापर करण्यात येईल. नवीन सीस्टिमनुसार डिजिटल स्वरूपात आतापर्यंत साडेसहा लाख बोटांचे ठसे, तसेच १,४३५ चान्सप्रिंट्सचा प्रणालीत समावेश आहे.

टॅग्स :मुंबईभाजपागुन्हेगारी