मुंबई : सामाजिक आणि राजकीय जीवनात वावरणाऱ्या मंडळींच्या मुखी कायम पुरोगामीत्वाचा जप असतो. भाषणातून वैज्ञानिकतेचा टेंभा मिरवणारी ही मंडळी प्रत्यक्षात सर्वसामान्यांमप्रमाणेच शुभाअशुभाच्या फेऱ्यात अडकलेलेल असतात. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी (२७ जानेवारी) पहिला दिवस होता. मात्र अख्ख्या मुंबईतून आज एकाही उमेदवाराने आपला अर्ज सादर केला नाही. माघी अमावस्येमुळे उमेदवारांनी पाठ फिरविल्यामुळे किती अर्ज दाखल झाले निवडणुक नोंदवहीच्या रकान्यात पहिल्या दिवशी मात्र ‘निरंक’ शेरा लिहीला गेला. वर्षभरापासून मुंबईतील राजकीय वर्तुळाला निवडणुकीचे वेध लागले. महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेऊनच वर्षभर राजकीय गणिते मांडण्यात आली. बहुचर्चित अशा मुंबई महापालिकेसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान आणि २३ ला मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणुक आयोगाने केली. तर, २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारणार असल्याचे जाहीर केले गेले. आज अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी निवडणुक कर्मचारी दिवसभर उमेदवारांची प्रतीक्षा करत होते. मात्र एकही उमेदवार तिकडे फिरकला नाही. मुंबईतून २२७ जागांपैकी एकाही जागेवर कोणत्याच पक्षाचा अथवा अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नाही. २७ तारखेला माघी अमावस्या आल्याने उमेदवारांनी अर्ज भरण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे. त्यातच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप उमेदवारी जाहीर होणे बाकी आहे. त्याचाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन दिवस फारसे अर्ज दाखल होण्याची शक्यता नाही. ३० व ३१ तारखेपासून अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी ३१ तारखेला माघी गणेश चतुर्थी असल्याने बहुतांश उमेदवार त्यादिवशी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. तर ३ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज सादर करता येणार आहेत. शिवसेना, भाजपाची युती २६ जानेवारी रोजी तुटली. या दोन्ही पक्षांनी २२७ उमेदवारांची यादी तयार असल्याच्या वल्गना केल्या असल्या तरी बंडखोरीच्या भीतीपोटी अद्याप नावांची घोषणा केली नाही. तर काँग्रेसने आघाडीस नकार दिल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसने एकूण ७६ जणांची उमेदवारी जाहीर केली. तर समाजवादी पक्ष आणि ओवेसी बंधुंच्या एमआएमनेही आपल्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र यापैकी कोणीच अर्ज घेऊन निवडणूक कार्यालयात दाखल झाले नाही. (प्रतिनिधी)
अमावस्येमुळे पहिला दिवस निरंक
By admin | Published: January 28, 2017 3:14 AM