गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पाणीपुरवठयाचे काम युद्धपातळीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 04:02 PM2020-08-23T16:02:30+5:302020-08-23T16:02:54+5:30
वरळीत ५७ इंच व्यासाची जलवाहिनी दुरुस्त केल्याने पाणीपुरवठा अखंडित
मुंबई : वरळी नाक्याजवळील डॉ. ई. मोझेस मार्गावर वरळी टेकडी जलाशयाची ५७ इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला वरळी स्मशानभूमीसमोर शनिवारी दुपारी अचानक गळती लागली होती. महानगर पालिकेच्या जल अभियंता विभागाच्या अभियंता, कर्मचाऱ्यांनी अहोरात्र राबून अवघ्या काही तासात ही जलवाहिनी दुरुस्त केली. आणि पाणीपुरवठा अखंडित ठेवण्याची स्तुत्य कामगिरी बजावली. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जनतेची पाणीपुरवठाबाबत कोणतीही अडचण होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या या पथकाने युद्धपातळीवर हे काम पूर्ण केले.
वरळी तसेच आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या या मुख्य जलवाहिनीतून गळती होत असल्याचा संदेश मिळाल्यानंतर जल अभियंता विभागातील दुरुस्ती विभागाचे अभियंता यांनी त्वरित दुरुस्तीची कामे हाती घेतली. शनिवारी दुपारपासून सुरू केलेले काम अहोरात्र जागून रविवारी सकाळी १० वाजता पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे यादरम्यान कुठलाही विभागाचा पाणीपुरवठा खंडित न करता दुरुस्तीची कामे काही तासात पूर्ण करण्यात आली. वरळी विभागातील डॉ. ई .मोझेस मार्ग, बीडीडी चाळ, नारायण पुजारी मार्ग, सर पोचखानवाला मार्ग, वरळी दूध डेअरी मार्ग या परिसरासह लगतचा पाणीपुरवठा खंडित न करता हे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे जी/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. जल विभागाचे प्रमुख अभियंता अजय राठोर यांच्या मार्गदर्शनाने, उप जल अभियंता कमलापुरकर यांच्या नियोजनाखाली सहाय्यक अभियंता जीवन पाटील व त्यांच्या पथकाने हे काम अथक प्रयत्न करून पूर्ण केले.