मान्सूनचा फर्स्ट डे, फर्स्ट शो हिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:29+5:302021-06-10T04:06:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मान्सूनपूर्व सरींच्या क्लायमॅक्सनंतर बुधवारी अखेर अतिवृष्टी घेऊनच वरुणराजा मुंबापुरीत दाखल झाला; आणि दाही दिशांना ...

First day of monsoon, first show hit | मान्सूनचा फर्स्ट डे, फर्स्ट शो हिट

मान्सूनचा फर्स्ट डे, फर्स्ट शो हिट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मान्सूनपूर्व सरींच्या क्लायमॅक्सनंतर बुधवारी अखेर अतिवृष्टी घेऊनच वरुणराजा मुंबापुरीत दाखल झाला; आणि दाही दिशांना तांडव करत त्याने अक्षरश: मुंबईत धुमाकूळ घातला. सकाळी सुरू झालेले मान्सूनचे तांडव दुपार ओसरली तरी सुरूच होते. सायंकाळी मात्र किंचित उसंत घेतलेल्या पावसाने मुंबईकरांना दिलासा दिला असला तरी ऑरेंज अलर्टमुळे मुंबईकरांना भरलेली धडकी कायम आहे.

मान्सूनने फर्स्ट डे, फर्स्ट शो हिट केला. मुंबई महापालिकेचे सगळे दावे पावसाच्या पाण्यात वाहून गेले. मुळातच याची सुरुवात मुंबईकर साखर झोपेत असताना झाली. पहाटे चार वाजल्यापासून मुंबईवर ढगांचा गडगडाट होऊ लागला. काळोख्या रात्री निवांत झोपेत असलेल्या मुंबईवर जलधारांचा सुरू झालेला वर्षाव बुधवारच्या पहाटे आणखी रौद्र झाला. विशेषत: मुंबईच्या पूर्व उपनगरात मान्सूनने मांडलेला पावसाचा खेळ दिवस वर येऊ लागला तसा आणखी रंगू लागला. दहा वाजता दाटून आलेल्या आभाळाने वातावरणाचा किंचितसा आढावा घेतला; आणि जणूकाही मुंबई बंद पाडण्याच्या इराद्याने पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी मुंबईवर चाल केली.

वाऱ्यावर स्वार झालेल्या मान्सूनने दुपारी एक वाजेपर्यंत मारा कायम ठेवला. अति मुसळधार ते मुसळधार अशा अस्त्रांचा मारा करतानाच वाऱ्याने त्याला साथ दिली. दुसरीकडे मान्सूनच्या पहिल्याच पावसाचे रौद्ररूप पाहून मुंबईकरांना धडकी भरली. एक कटिंग चाय, गरमागरम भजीसारखे प्रयोग पहिल्या पावसात तसे बेतानेच झाले. मुळात अनेकांचे घरून काम सुरू असल्याने मुसळधार पावसामुळे सातत्याने जात असलेल्या नेटवर्कपायी ते त्रासून गेले. ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा; अशा काहीशा धडकी भरविणाऱ्या वातावरणाने घरात बसूनच पहिला पाऊस ओसरण्याची अनेकांनी वाट पाहिली.

दरम्यान, समाजमाध्यमांवर मात्र पहिल्या पावसाचे नेटकऱ्यांनी जोरदार स्वागत केले. कवितांतून पाऊस उतरला. भावनांतून पाऊस उतरला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कुणाला कॉलेजचे दिवस आठवले, तर कुणाला पिकनिकचे. मग रंगू लागला मान्सून पिकनिकचा बेत. तर पाऊस ओसरल्यानंतर साचलेल्या पाण्यात चिमुकल्यांच्या होड्या धावू लागल्या. काहींनी खिडकीतूनच पहिला पाऊस पाहिला. तर काही जणांनी थेट चाल करून आलेल्या मान्सूनलाच अंगावर घेत पहिल्या पावसाचा मनमुराद आनंद लुटला. अशाच काहीसा मनमुराद बरसलेल्या, मुंबईकरांना धडकी भरविलेल्या मान्सूनचा मारा आता पुढील चार महिने कायम राहणार आहे.

.................................................

Web Title: First day of monsoon, first show hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.