लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धुंद करणारे वातावरण, आकाशात गडद मेघांची झालेली दाटी आणि अशास्थितीत दूरदेशी राहिलेल्या प्रेयसीच्या आठवणीने व्याकूळ होत तिचा विरह सहन करणारा प्रियकर; अशी वेळ सध्याच्या युगात कुणावर आली, तर आधुनिक यंत्रणेद्वारे त्यावर त्वरित तोडगा काढता येणे सहजशक्य आहे. पण ही स्थिती जर कवीकुलगुरु कालिदासाच्या काळातील आहे असा विचार केल्यास, त्यावेळी यासाठी काय प्रयास केले गेले असतील, याची केवळ (कवी) कल्पनाच करता येईल.
कवीकुलगुरु कालिदासाने मात्र अशास्थितीत थेट मेघालाच संदेशवहन करायला लावले आणि त्यातून ‘मेघदूत’ हे अजरामर काव्य जन्माला आले. या काव्यामुळे प्रेमीजनांची कथा आणि व्यथा तर कायम जागती राहिलीच; परंतु ज्यादिवशी हे काव्य कालिदासाला स्फुरले, तो आषाढाचा पहिला दिवसही शतकानुशतके कालिदासाची याद जागवत राहिला आहे.
यादिवशी मेघाकरवी धाडलेला सांगावा आणि त्याबरहुकूम प्रसवलेल्या ‘मेघदूत’ या काव्याने शतकानुशतके भारतवर्षातीलच नव्हे, तर परदेशातही अनेकांना त्याची पारायणे करायला भाग पाडले आहे.
कालिदासाचा हा ‘आषाढस्य प्रथम दिवसें’ कालचक्रागणिक कलियुगातही येत असला, तरी अनंतकाळाचे गूढ घेऊनच तो उजाडतो. वास्तविक, सर्व मराठी मासांप्रमाणे आषाढ महिनाही तसाच येतो; पण पहिल्या दिवसाला गहिरी डूब देऊनच त्याची पुढे वाटचाल होते.
ज्या कवी कालिदासाने आषाढाचा पहिला दिवस ठळकपणे अधोरेखित करून त्याला चिरंजीवित्व प्राप्त करून दिले, त्या कालिदासाचा जन्म कुठला आणि कोणत्या काळातला याविषयी अचूक माहिती सामान्यतः उपलब्ध नाही. परंतु, ज्या रामगिरी पर्वतावर त्याने ‘मेघदूत’ रचले, तो पर्वत म्हणजे आजच्या नागपूरजवळचा रामटेक ही बाब मात्र सर्वमान्य आहे. एका ठिकाणी याबाबत मध्य प्रांतातील रामगढ या डोंगराचा दाखलाही मिळतो. अलकानगरी सोडून जो यक्ष कुबेराने शाप दिल्याने रामगिरीवर आला आणि जो ‘मेघदूत’ या काव्यासाठी निमित्तमात्र ठरला, तो यक्ष दुसरा, तिसरा कुणी नसून कालिदासच असावा; अशी शक्यताही वर्तवली जाते.
प्रत्यक्ष जीवनातील अनुभव
काही असले तरी आषाढाच्या पहिल्या दिवशी प्रियतमेला मेघाकरवी सांगावा धाडण्याची कल्पना ही केवळ कवीकल्पना असू शकत नाही. ही घटना म्हणजे कालिदासाच्या प्रत्यक्ष जीवनातील अनुभव असावा, असेही म्हटले जाते. आषाढाच्या पहिल्या दिवशी अशी अनेकविध गूढ वलये हटकून चक्रावून टाकतात खरी; परंतु त्यामुळे यादिवशी कालिदासाने रचलेल्या काव्याची महती मात्र तीळभरही कमी होत नाही, यातच सर्वकाही आले.