Join us

पहिला विकास आराखडा अंतिम टप्प्यात: ११४ हेक्टर जागेसाठी स्वतंत्र आराखडा, एमएमआरडीएच्या जागांचा पालिका करणार विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 4:53 AM

रस्ते, उड्डाणपूल आणि आता मुंबईतील काही परिसरांचा ताबा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई महापालिकेकडे दिला आहे.

मुंबई : रस्ते, उड्डाणपूल आणि आता मुंबईतील काही परिसरांचा ताबा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई महापालिकेकडे दिला आहे. आतापर्यंत एमएमआरडीएच्या अखत्यारीत असलेला कुर्ला, अंधेरी पश्चिम आणि वांद्रे पश्चिमचा काही भाग आता महापालिकेच्या ताब्यात आला आहे. मात्र या जागांचा ताबा मिळेपर्यंत सन २०१४-३४पर्यंतच्या विकास आराखड्याची मंजुरी अंतिम टप्प्यात होती. त्यामुळे महापालिकेला या ११४ हेक्टर जागेसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा लागणार आहे.मुंबईचे पुढील २० वर्षांचे भवितव्य ठरविणारा विकास आराखडा तीन वर्षे रखडल्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस मंजूर झाला. या विकास आराखड्याची प्रक्रिया २०११पासून सुरू होती. मात्र आरे कॉलनीचा ना विकास क्षेत्र बांधकामांसाठी खुला करणे अशा काही शिफारशी वादग्रस्त ठरल्या. त्यामुळे सुधारित विकास आराखडा तयार करण्याची वेळ महापालिकेवर आली. नागरिकांकडून हरकती व सूचना, त्यावर नियोजन समितीपुढे सुनावणीनंतर हा आराखडा पालिकेच्या महासभेत मंजूर करून राज्य शासनाच्या नगर विकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे.आता ‘एमएमआरडीए’ने एच/पश्चिम भागातील वांद्रे रेक्लमेशन, एल विभागातील मिठी नदी आणि लाल बहादूर शास्त्री मार्गमधील परिसर आणि के/ पश्चिममधील एस. व्ही. रोड आणि लिंकिंग रोडमधील परिसराचा विकास आराखडा बनविण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला केल्या आहेत. या जागा आतापर्यंत एमएमआरडीएच्या अखत्यारीत असल्याने पालिकेला त्या भागांचा विकास करता येत नव्हता. मोठ्या प्रमाणात झोपड्या आणि अतिक्रमण असलेला हा भाग असल्याने त्यांच्या विकासाचे आव्हान पालिकेसमोर असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.या जागा आता पालिकेकडेमुंबईचा विकास आणि नियोजनाची जबाबदारी महापालिकेकडे आहे. मात्र स्वतंत्र प्राधिकरण असलेल्या एमएमआरडीएने कफ परेड, बॅकबे, वांद्रे-कुर्ला संकुल, ओशिवरा, वांद्रे पश्चिम या भागांचे नियोजन आपल्याकडे ठेवल्यामुळे या भागातील विकासकाम मुंबई महापालिकेला करता येत नव्हते.यापैकी अंधेरी पश्चिमचे ३९.३ हेक्टर्स, वांद्रे कुर्ला संकुलाची ४७.३७ हेक्टर (यामध्ये वांद्रे रेक्लमेशन, लीलावती रुग्णालय आणि ओएनजीसी कॉलनीचा समावेश) तसेच लाल बहादूर शास्त्री मार्ग व कुर्ला येथील मिठी नदीच्या आसपासचा २७.३७ हेक्टर परिसर पालिकेच्या ताब्यात आला आहे.असा तयार होणार स्वतंत्र आराखडा : या ११४ हेक्टर जागेच्या विकासाचा स्वतंत्र नियोजन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या भागांच्या भू वापर नकाशांचा अभ्यास करून हा आराखडा तयार होत आहे. त्यानंतर मूळ नियोजन आराखड्याप्रमाणेच सर्वप्रथम आराखडा जाहीर करून त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. ६० महिन्यांच्या कालावधीत या सूचना आल्यावर नियोजन समितीपुढे त्यावर सुनावणी होऊन अंतिम मंजुरीसाठी पालिकेच्या महासभेपुढे पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका