Join us

राज्याचे पहिले पोलीस महासंचालक के. पी. मेढेकर यांचे निधन, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 3:00 AM

पहिले पोलीस महासंचालक कृष्णकांत पांडुरंग मेढेकर यांचे सोमवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. अंधेरी येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई : पहिले पोलीस महासंचालक कृष्णकांत पांडुरंग मेढेकर यांचे सोमवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. अंधेरी येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात पत्नी अंजली, मुलगी वैजयंती गुप्ते, मुलगा अजित आणि राजन, सून देवयानी, गीता आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी साडेदहापर्यंत वर्सोवा येथील पोलीस आॅफिसर प्रोग्रेसिव्ह को-आॅप. सोसायटीतील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. अकरा वाजता सरकारी इतमामात पोलीस मानवंदना देण्यात आल्यानंतर अंधेरी पूर्वेतील सहार रोड येथील पारसीवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.मेढेकर यांनी १९४९ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची सनदी पोलीस अधिकारी म्हणून निवड झाली. तेथून १९५६ मध्ये पुणे रेल्वे अधीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. आयपीएस अधिकारी असलेले मेढेकर हे के. पी. मेढेकर या नावाने प्रसिद्ध होते. ते पहिले पोलीस महासंचालक ठरले. २५ फेब्रुवारी १९८२ ते ३० एप्रिल १९८५ या दरम्यान ते पोलीस महासंचालकपदी कार्यरत होते. १९८२ मध्ये चांगल्या वेतनासह विविध मागण्यांसाठी पोलिसांनीच बंड पुकारले होते. मेढेकर यांनी बंड शमवण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.त्यांनी मुंबई पोलीस दलाबरोबरच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, केंद्रीय गुप्तवार्ता विभागासह अनेक विभागांत महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी सचोटीने काम केले. त्यांच्यावर पंतप्रधानांचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.मेढेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी महाराष्टÑ पोलीस मुख्यालयात (छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, कुलाबा, मुंबई) संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत शोकसभा होणार आहे.

टॅग्स :पोलिस