मुंबईतील पहिले ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ दादरमध्ये सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:58 AM2021-05-05T05:58:53+5:302021-05-05T05:59:23+5:30
दिवसभरात पाच हजार लसीकरणाची क्षमता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांचे लसीकरण वेगाने होण्यासाठी महापालिकेने मुंबईतील पहिले ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ मंगळवारपासून सुरू केले. दादरच्या कोहिनूर स्क्वेअरच्या पार्किंग लॉटमध्ये सुरू केलेल्या या केंद्रामध्ये दररोज पाच हजार लोकांचे लसीकरण होऊ शकेल.
या केंद्राचे लोकार्पण खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. लसीकरणासाठी रांगा लागत असल्याने ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांची गैरसोय होते, तर घरोघरी जाऊन लसीकरणाची मुभा सरकारने दिलेली नाही. त्यामुळे ड्राइव्ह इन लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
कोहिनूर वाहनतळावर एकूण दोन बूथ आहेत. तेथे लस घेण्यासाठी येणाऱ्यांनी नोंदणी केली नसेल तर वाहनात बसूनच त्यांना नोंदणीही करता येते. वाहनात थांबूनच त्यांना निरीक्षणाचा कालावधी पूर्ण करता येतो. लस घेण्यासाठी बूथपासून किमान ५० वाहने एकाचवेळी रांगेत थांबू शकतील व निरीक्षण कालावधी पूर्ण करेपर्यंत किमान १०० वाहने एकाचवेळी थांबू शकतील इतकी जागा येथे उपलब्ध करण्यात आली आहे.
दिवसभरात पाच हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता
निरीक्षण कालावधी दरम्यान काही त्रास वाटला तर संबंधित नागरिक हॉर्न वाजवून इशारा करू शकतात. तसेच वाहनांमध्ये थांबूनच, लस घेऊन ये-जा होत असल्याने प्रत्यक्ष जागेवर वर्दळ होत नाही, परिणामी संसर्गाचा धोका नाही. मंगळवारी संध्याकाळपर्यंत २२७ वाहनांतून आलेल्या ३६५ नागरिकांना या केंद्रावर लस देण्यात आली. कोहिनूर वाहनतळावरील ड्राइव्ह इन लसीकरण केंद्रावर दोन सत्रांमध्ये आठ डॉक्टर, ७० वॉर्डबॉय, १८ परिचारिका नेमण्यात आले आहेत. लससाठा पुरेसा उपलब्ध असेल तर दिवसभरात पाच हजार नागरिकांना लसीकरण करण्याची क्षमता या केंद्रामध्ये आहे.
- किरण दिघावकर, सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग