हज यात्रेचे मुंबईतील पहिले विमान २९ जुलैला उडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 12:41 AM2018-07-07T00:41:14+5:302018-07-07T00:41:58+5:30
हज यात्रेसाठी मुंबईतून पहिले विमान २९ जुलै रोजी उड्डाण करणार आहे. २९ जुलै ते १२ आॅगस्ट या कालावधीत मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेकरूंना घेऊन विमाने सौदी अरेबियामध्ये जातील. मुंबईतून यंदा १४ हजार ६०० यात्रेकरू हज यात्रेला जाणार आहेत.
मुंबई : हज यात्रेसाठी मुंबईतून पहिले विमान २९ जुलै रोजी उड्डाण करणार आहे. २९ जुलै ते १२ आॅगस्ट या कालावधीत मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेकरूंना घेऊन विमाने सौदी अरेबियामध्ये जातील. मुंबईतून यंदा १४ हजार ६०० यात्रेकरू हज यात्रेला जाणार आहेत.
मुंबईतील हज यात्रेसाठीचा विमानाचा हा दुसरा टप्पा आहे. उड्डाणे सुरू झाल्यानंतर प्रत्येक दिवशी सरासरी पाच ते सहा विमानांची उड्डाणे होतील. राज्यातून मुंबईव्यतिरिक्त औरंगाबाद, नागपूर येथून हज यात्रेसाठी विमाने जाणार आहेत. औरंगाबाद येथून २९ ते ३१ जुलै या कालावधीत तर नागपूर येथून २९ जुलै ते ४ आॅगस्ट या कालावधीत विमानाद्वारे हज यात्रेकरू हजला जातील.
केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मक्सुद अहमद खान यांनी ही माहिती दिली. यात्रेकरूंना थेट जेद्दाह येथे पाठविण्यात येईल. त्यांचा परतीचा प्रवास मदिना येथून सुरू होईल. परतीच्या प्रवासात मुंबईसाठी मदिना येथून १२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत विमानांची उड्डाणे होतील. तर नागपूरसाठी ११ ते १८ सप्टेंबर या कालावधीत उड्डाणे होतील. औरंगाबादसाठी १३ व १४ सप्टेंबर रोजी विमानांची उड्डाणे होतील. दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद, चेन्नई, मुंबई, नागपूर, रांची, अहमदाबाद, बंगळुरू, कोचीन, हैदराबाद, जयपूर व भोपाळ या ११ एम्बार्केशन पॉइंटवरून उड्डाणे होणार आहेत.
पहिला टप्पा
१४ जुलैपासून
पहिल्या टप्प्यात १४ जुलैपासून विमानांची उड्डाणे होतील. त्यामध्ये दिल्ली, गया, गुवाहाटी, लखनऊ, श्रीनगर, कोलकाता, वाराणसी, मंगळुरू व गोवा या एम्बार्केशन पॉइंट्सचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील विमानांद्वारे यात्रेकरूंना मदिना येथे सोडण्यात येईल व त्यांचा परतीचा प्रवास जेद्दाह येथून होईल. पहिल्या टप्प्यातील पहिले विमान १४ जुलै रोजी उडेल, तर शेवटचे विमान २९ जुलै रोजी उडेल. परतीच्या प्रवासात जेद्दाह येथून पहिले विमान २७ आॅगस्टला सुटेल तर शेवटचे विमान २६ सप्टेंबर रोजी सुटेल.