देशातील पहिले तरंगते टर्मिनल महाराष्ट्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 07:25 AM2021-04-20T07:25:00+5:302021-04-20T07:25:10+5:30
६ कोटी टन वायू मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने सागरी क्षेत्रातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. देशातील पहिले तरंगते टर्मिनल उभारण्याचा बहुमान महाराष्ट्राने पटकावला आहे. द्रवरुप नैसर्गिक वायूचे देशातील पहिले तरंगते टर्मिनल जयगड बंदरात उभारण्यात आले असून, त्यातून वार्षिक ६ कोटी टन वायू उपलब्ध होऊ शकेल.
देशाला लागणाऱ्या इंधनातील नैसर्गिक वायूचे मिश्रण ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेण्याचे केंद्र
सरकारचे धोरण आहे. या धोरणांतर्गत एच-एनर्जी या कंपनीने पुढाकार घेत रत्नागिरीतील जयगडमध्ये तरंगते टर्मिनल उभारले आहे. तेथे नैसर्गिक वायूचा साठा केला जाईल. यासाठी ‘होहेग जायंट’ नावाचे जहाज सिंगापूरहून आणण्यात आले आहे. त्यात द्रवरुप वायूचा साठा केला जाईल.
चाचणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात टर्मिनलचा वापर सुरू केला जाईल. हे टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर भारताचे नैसर्गिक वायूबाबतचे अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि आयातीत घट होईल, असा विश्वास एच - एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन हिरानंदानी यांनी व्यक्त केला.
क्षमता किती?
या टर्मिनलची क्षमता १.७० लाख घनमीटर आहे. त्याद्वारे दररोज ७५ कोटी घनफूट नैसर्गिक वायू तयार केला जाऊ शकतो. त्यानंतर हा घनरुप वायू दाभोळच्या वीजनिर्मिती केंद्राला विशेष वाहिनीद्वारे पुरवला जाईल. हे अंतर सुमारे ५६ किमी इतके आहे. जहाजांमधूनही हा वायू देशात अन्यत्र नेला जाऊ शकतो.