मुंबई : सोशल मीडियावरून आधी बनावट अकाउंटद्वारे मुलगी असल्याचे भासवून तरुणांशी मैत्री करायची. पुढे सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्यांना सरकारी रुग्णालयात बोलवायचे. अर्ज भरण्याच्या नावाख़ाली त्यांचा मोबाईल घेऊन पसार होणाऱ्या ठगाला कांदिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हमीद सलीम शेख (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो रुमेशा सिद्दीकी या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करून तरुणांशी संपर्क करत होता. आरोपींवर यापूर्वीच अशा प्रकारचे ४ गुन्हे नोंद आहेत.
तपासादरम्यान आरोपीने बनावट अकाउंटवरून तरुणाशी मैत्री केली. पुढे कांदिवली पश्चिम येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये नोकरीच्या नावाखाली बोलावून अर्ज भरण्याचा बहाणा करून त्याचा मोबाईल घेऊन पळ काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या वेळी शेखचा चेहरा तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत शेखला अटक केली. चौकशीत त्याने शताब्दी रुग्णालयास जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कूपर रुग्णालयातही मुलांना नोकरीच्या नावाखाली बोलावून त्यांचा मोबाईल पळवल्याचे समोर आले आहे.
चोरीच्या मोबाईलची ओएलएक्सवर विक्रीफसवणूक करून पळवलेले सर्व मोबाईल तो ओएलएक्सवर विकत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. आतापर्यंत मुंबईतील चार गुन्हे समोर आले आहे. त्याने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
तुमचीही फसवणूक झाली आहे का?...अशाप्रकारे तुमचीही फसवणूक झाली असल्यास कांदीवली पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांकड़ून करण्यात आले आहे.
...