५८ बँक खाती, १७१ फेसबुक पेजेस ब्लाॅक, सायबर पोलिसांची कारवाई
आधी मैत्री, नंतर अश्लील व्हिडीओ कॉलद्वारे खंडणीची मागणी
५८ बँक खाती, १७१ फेसबुक पेजेस ब्लाॅक, सायबर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोशल मीडियावरून तरुणीच्या बनावट नावाने मैत्री करायची. सावज जाळ्यात अडकताच अश्लील व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधायचा. पुढे याच व्हिडीओच्या आधारे खंडणी उकळणाऱ्या आंतरराज्यीय सेक्स्टाॅर्शन रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी पर्दाफाश करत तिघांना अटक केली. तसेच ५८ बँक खाती, १७१ फेसबुक पेजेस आणि ५ टेलिग्राम चॅनेल्स ब्लाॅक केली.
सायबर विभागाच्या उपायुक्त डाॅ. रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रमुख पोलीस निरीक्षक एस. सहस्रबुद्धे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या टोळीने फेसबुक, इन्स्टाग्राम, गुगल, व्हाॅट्सॲप, टेलिग्राम अशा विविध सोशल मीडिया साधनांवरील युजर्सच्या पोस्टवर बारकाईने नजर ठेवून ही टोळी पूजा शर्मा, नेहा शर्मा अशा बनावट नावाने बनावट प्रोफाइलद्वारे संबंधित व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होती. ती स्वीकारल्यानंतर मैत्री वाढवत ॲपमधील मेसेंजरच्या माध्यमातून चॅटिंग सुरू करत हाेती. त्यानंतर या मेसेंजरच्या माध्यमातून किंवा त्या व्यक्तीकडून व्हाॅट्सॲप नंबर घेऊन सुट्टीचा दिवस बघून त्यावर व्हिडीओ काॅल केला जात असे. पुढे हाच व्हिडीओ, यातील फोटो नातेवाईक तसेच सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत दोन ते पाच हजार रुपयांपासून लाखो रुपये उकळत होते.
* व्हिडीओ हाताळण्यासाठी तीन दिवस प्रशिक्षण
यात व्हिडीओ कसा बनवायचा यासाठी या टोळीने तीन दिवस प्रशिक्षण घेतले. यात, टोळीने रॅकेट चालविण्यासाठी ५४ मोबाइलचा वापर केला असून पेटीएम आणि फोन पे वाॅलेट ॲपचा वापर करत ५८ बँक खात्यांचा वापर केला.
....