केईएम रुग्णालयात पहिल्यांदाच झाली हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 08:20 AM2021-08-13T08:20:18+5:302021-08-13T08:20:30+5:30
केईएम रुग्णालयाला २०१६ मध्ये हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा परवाना मिळाला. मात्र, या पाच वर्षांत एकही हात प्रत्यारोपण झालेले नव्हते.
मुंबई : पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात पहिल्यांदाच हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारी एका तरुणावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून उजवा हात त्याला मिळवून देण्यात आला.
केईएम रुग्णालयाला २०१६ मध्ये हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा परवाना मिळाला. मात्र, या पाच वर्षांत एकही हात प्रत्यारोपण झालेले नव्हते. दोन महिन्यांपूर्वी त्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले. शहर उपनगरात एका तरुणाला काही दिवसांपूर्वी ब्रेनडेड घोषित करण्यात आले. या तरुणाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे जवळपास पाच जणांचे प्राण वाचले. हातासह फुप्फुस, यकृत, किडनी, कॉर्निया आणि त्वचा हे अवयव दान करण्यात आले.
ब्रेनडेड तरुणाचे हात दान होणार असल्याची माहिती मिळताच अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा यादीत असणाऱ्या मध्य प्रदेशमधील एका तरुणाला मुंबईत बोलावण्यात आले. या तरुणावर उजव्या हाताच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.
या शस्त्रक्रियेनंतर हातात पूर्णपणे संवेदना, हालचाल व ताकद यायला एक वर्ष लागेल. त्याला फिजिओथेरपी द्यावी लागणार आहे. त्याच्या रोगप्रतिकारशक्तीवरही काम करावे लागणार आहे. त्यामुळे, ही खूप मोठी प्रक्रिया आहे.
१८ हून अधिक तासांची जटिल शस्त्रक्रिया
हाताचे प्रत्यारोपण करण्यासाठी जवळपास १८ ते २४ तास लागतात. या प्रत्यारोपणात दोन मुख्य धमन्या, सहा शिरा, आठ नसा आणि १२ टेंडन्स आणि हाडे जोडली जातात.
आज जागतिक अवयवदान दिन
अवयवदानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. कोरोनाकाळात अवयवदानाचे प्रमाण कमी झाले. तरी गेल्या आठ महिन्यांत मुंबईत ८३ अवयवदान झाले. आता अवयवदानाने पुन्हा उभारी घेतली आहे. हात प्रत्यारोपणाची बातमी म्हणूनच दिलासादायक आहे.
पहिली यशस्वी नोंद
हात दान व हात प्रत्यारोपणाची ही पहिली यशस्वी नोंद पालिकेच्या रुग्णालयात झाली. याआधी लोकलमधून पडलेल्या मोनिका मोरेच्या हातांचे गेल्या वर्षी पहिल्यांदा मुंबईत प्रत्यारोपण करण्यात आले होते. मोनिकासाठी चेन्नई ग्लोबल रुग्णालयातून हाताची मदत झाली होती. परळ येथील खासगी रुग्णालयात प्रत्यारोपण झाले होते.