Join us

या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 6:11 AM

उद्धवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेसाठी सुषमा अंधारे महाड येथे उपस्थित होत्या. शुक्रवारी रोहा येथील प्रचारसभेसाठी त्या आणि त्यांचा भाऊ जाणार होते.

महाड : उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना रोहा येथील प्रचारसभेसाठी घेऊन जाण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर लँडिंग करतेवेळी एका बाजूला झुकल्याने अपघातग्रस्त झाले. या अपघातात पायलट किरकोळ जखमी झाला. शुक्रवारी सकाळी येथील चिचकर मैदानावर हा प्रकार घडला. 

उद्धवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेसाठी सुषमा अंधारे महाड येथे उपस्थित होत्या. शुक्रवारी रोहा येथील प्रचारसभेसाठी त्या आणि त्यांचा भाऊ जाणार होते. यासाठी पुणे येथील महालक्ष्मी एव्हिएशन प्रॉडक्ट लिमिटेड या कंपनीचे हेलिकॉप्टर आरक्षित केले होते. सकाळी नऊ वाजता पायलट नितीन वेल्डे हेलिकॉप्टर घेऊन चिचकर मैदानावर उतरविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, लँडिंग करण्यासाठी हेलिपॅड नसल्याने अडचण आली. हेलिकॉप्टर उतरविण्याच्या वेळी ते एका बाजूला कलंडून मैदानातच कोसळले. या अपघातात नितीन वेल्डे किरकोळ जखमी झाले. अपघात झाला तेव्हा सुषमा अंधारे व त्यांचा भाऊ एका कारमध्ये होते. हेलिकॉप्टर कलंडल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांना पोलिसांनी रोखले. 

आचारसंहितेच्या काळात चॉपर उतरवणे आयोजक कंपनीची जबाबदारी असते. या मैदानावर पालकमंत्री, मुख्यमंत्री, यांचे हेलिकॉप्टर उतरले आहे. हेलिकॉप्टर परवानगीबाबत तीन दिवस आधी परवानगी घ्यावी असे पत्र आले आहे. पायलटकडून तांत्रिक कारणाने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

- संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :रायगड