आधी हिजाबबंदी, आता जीन्स, टी-शर्टलाही मनाई; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवा ड्रेसकोड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:47 AM2024-07-03T06:47:44+5:302024-07-03T06:48:38+5:30
चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमधील प्रकार, आता महाविद्यालयाने परिपत्रक काढून जीन्स, टी-शर्ट परिधान करण्यास मनाई केली आहे
मुंबई - हिजाबबंदीमुळे चर्चेत आलेल्या चेंबूरच्या आचार्य-मराठे महाविद्यालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट आणि जर्सीही परिधान करता येणार नाही. महाविद्यालय व्यवस्थापनाने ड्रेसकोडसंदर्भात विशेष नियमावली जारी केली असून, जीन्स, टी-शर्ट आणि जर्सीवरही बंदी घातली आहे. हिजाबबंदीनंतर महाविद्यालय प्रशासनाने लागू केलेला हा नवा ड्रेसकोड विद्यार्थी आणि पालकांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी आचार्य मराठे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ड्रेसकोड लागू केला होता. महाविद्यालय प्रशासनाने निश्चित केलेला गणवेश परिधान करूनच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात होता. गेल्या वर्षाप्रमाणे याहीवर्षी कॉलेजच्या व्यवस्थापनाने बुरखा, हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली. त्याबाबतच्या सूचना प्रवेश अर्जात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. त्याला काही विद्यार्थिनींनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हिजाबवर बंदी घालण्याचा निर्णय हा गोपनीयता, सन्मान आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचा दावा याचिकादार विद्यार्थिनींनी केला होता. मात्र, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. आता महाविद्यालयाने परिपत्रक काढून जीन्स, टी-शर्ट परिधान करण्यास मनाई केली आहे.
ड्रेसकोडची सक्ती म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी आहे. आचार्य मराठे कॉलेजने काढलेल्या बंदीच्या फर्मानाचा प्रहार विद्यार्थी संघटना निषेध करते. प्राचार्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा प्रहार विद्यार्थी संघटना आंदोलन करेल. - ॲड. मनोज टेकाडे, राज्य अध्यक्ष, प्रहार विद्यार्थी संघटना
महाविद्यालयाच्या परिपत्रकात नेमके काय?
विद्यार्थ्यांनी धर्म प्रकट करणारा किंवा सांस्कृतिक विषमता दर्शवणारा कोणताही पोशाख घालू नये. नकाब, हिजाब, बुरखा, टोपी, बॅज इत्यादी वस्तू तळमजल्यावरील कॉमन रूममध्ये काढून नंतरच विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश करावा. फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, तोकडे कपडे आणि जर्सी परिधान करण्यासह कॉलेज परिसरात परवानगी नसेल, असे या परिपत्रकात म्हटले आहे.