"स्वामी" योजनेतील पहिला गृहनिर्माण प्रकल्प;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:07 AM2021-05-14T04:07:06+5:302021-05-14T04:07:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्र सरकारने परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांच्या घर खरेदीसाठी सुरू केलेल्या एक खिडकी ...

The first housing project under the Swami scheme; | "स्वामी" योजनेतील पहिला गृहनिर्माण प्रकल्प;

"स्वामी" योजनेतील पहिला गृहनिर्माण प्रकल्प;

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्र सरकारने परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांच्या घर खरेदीसाठी सुरू केलेल्या एक खिडकी योजनेअंतर्गत साकारलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थींना गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने सदनिकांचा ताबा देण्यात आला.

मुंबई उपनगरातील ''रिवली पार्क'' हा केंद्राच्या एक खिडकी योजनेतून साकारलेला पहिलाच गृहनिर्माण प्रकल्प आहे. अर्थमंत्री सितारमन यांनी २०१९ साली या योजनेअंतर्गत विशेष निधीची घोषणा केली होती. रिवाली पार्क विंटरग्रीन्स ही या निधीतून केलेली पहिली गुंतवणूक आहे. तसेच पूर्णत्वाला गेलेला पहिला प्रकल्प आहे. सात एकर जागेवरील या प्रकल्पात विविध आकाराची ७९८ घरे आहेत. केबल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची सहयोगी कंपनी सीसीआय प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने हा प्रकल्प विकसित केला आहे.

यावेळी अर्थमंत्री सितारमन म्हणाल्या की, स्वामी (SWAMIH) निधीने कोविडच्या कठीण काळात काम पूर्ण केल्याने हा महत्त्वाचा प्रकल्प ठरला आहे. केंद्र सरकारने परवडणाऱ्या तसेच मध्यम उत्पन्न गटाच्या गृहनिर्माण प्रकल्पांना अर्थसाहाय्य देण्यासाठी पाऊल उचलले आहे. घरांची बांधणी झाली की या प्रकल्पांमध्ये अडकलेले मोठे भांडवल उपलब्ध होईल. अशा प्रकल्पातून बांधकाम कामगारांना रोजगार आणि पोलाद - सिमेंट यासारख्या उद्योगांनाही चालना मिळेल, असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.

स्वामी (SWAMIH) गुंतवणूक निधीतून आतापर्यंत ७२ प्रकल्पांना अंतिम मंजुरी देण्यात आली असून त्यातून ४४,१०० घरे बांधली जाणार आहेत, तर, प्राथमिक मंजुरी मिळालेल्या १३२ प्रकल्पांतून ७२,५०० घरे साकारली जाणार आहेत.

या ऑनलाईन कार्यक्रमाला सितारमन यांच्यासह राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: The first housing project under the Swami scheme;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.