यंदाच्या वर्षातले पहिले चक्रवादळ शुक्रवारी उठणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:17 AM2020-04-27T04:17:12+5:302020-04-27T04:17:23+5:30
महत्त्वाचे म्हणजे पारा वाढत असतानाच विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.
मुंबई : उत्तर आणि दक्षिण भारतात कमाल तापमान वाढीच्या वेगाचा आलेख उंचावत असतानाच आता २०२० या वर्षातील पहिले चक्रीवादळ १ मे रोजी उठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालची खाडी, अंदमानचा समुद्र येथे या चक्रीवादळहोण्याचे संकेत मिळाले असून, यानुसार चक्रीवादळाचा पुढील प्रवास म्यानमार आणि बांग्लादेशाच्या दिशेने होईल, अशी माहिती स्कायमेटने दिली. तर दुसरीकडे महाराष्ट्रात २७ आणि २८ एप्रिल रोजी ठिकठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशावर राहील; महत्त्वाचे म्हणजे पारा वाढत असतानाच विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.
येत्या आठवड्यात महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे. विखुरलेल्या स्वरुपात तुरळक ते मध्यम प्रमाणात होणारा हा पाऊस मुख्यत्वे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. २७ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल. २८ एप्रिल रोजी विदर्भात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडेल. २९ आणि ३० एप्रिल रोजी संपुर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर दुसरीकडे कोरोनाचा कहर सुरु असतानाच २०२० या वर्षातील पहिले चक्रीवादळ बंगालच्या खाडीत उठण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
>चक्रीवादळ मार्ग बदलण्याची शक्यता
अंदमानाच्या समुद्रात २७ एप्रिल रोजी चक्रीवादळाची चिन्हे दिसण्याची शक्यता आहे. २४ तासांत येथे निर्माण झालेल्या चक्रवाताचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरण होईल. आणि यास हवामान पूरक असल्याने २९ ते ३० एप्रिल या काळत कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर आणखी वाढेल. आणि १ मे रोजी २०२० या वर्षातील पहिले चक्रीवादळ अंदमानच्या समुद्राच्या उत्तर भागावर निर्माण होईल. याचा परिणाम म्हणून अंदमान, निकोबार येथे वेगाने वारे वाहतील. पाऊस कोसळेल. हे चक्रीवादळ पुढे सरकत बंगालच्या खाडीवर येईल. भारताच्या किनारी येईपर्यंत चक्रीवादळाचा जोर आणखी वाढेल. मात्र आतापर्यंत मिळलेल्या संकेतानुसार, चक्रीवादळाचा मार्ग बदलण्याची शक्यता असून, हे चक्रीवादळ म्यानमार आणि बांग्लादेशच्या दिशेने रवाना होईल.