अलिबाग : तालुक्यातील आक्षी येथील मराठीतील पहिल्या शिलालेखाचे जतन करून त्याचे संग्रहालय उभारण्यात येईल, असा विश्वास भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केला. मराठीतील पहिल्या शिलालेखाचा वनवास लवकरच संपणार असून राजभाषादिनी मराठीचा गौरव होत असल्याचे बोलले जात आहे.मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनने भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांना या ठिकाणी आमंत्रित केले होते. शिलालेखाच्या संग्रहालयासाठी रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनने पुढाकार घेऊन लवकरच सरकारकडे प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सूचित केले. इसवी १११६ मधील श्रवणबेळगोळ येथील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख म्हणून ओळखला जात होता. प्रसिद्ध संशोधक शं. गो. तुळपुळे यांनी आक्षीच्या शिलालेखाचे प्राचीनत्व सिद्ध केले. आक्षी येथील शिलालेख हा शके ९३४ इ. स. १०१२ मधील आहे. आक्षी येथील शिलालेख अतिप्राचीन असून सध्या त्याची दुरवस्था झाली आहे. त्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनने हा प्रश्न माधव भंडारी यांच्याकडे मांडला. भंडारी यांनी यांची पाहणी केली. पुरातन वस्तू, शिल्प यांचे जतन व्हावे, यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यानुसार आक्षीच्या शिलालेखाचे जतन, संवर्धन करता यावे म्हणून संग्रहालय उभारण्यासाठी सर्वाेतोपरी मदत करण्यात येईल, असे भंडारी यांनी सांगितले. तालुक्यामध्ये अशा पुरातन वस्तू, शिल्प असतील त्यांचे एकत्रीकरण करून सरकारी जागेवर संग्रहालय उभारण्यात येईल. आक्षी येथील पुरातन ठेवा हा तेथेच राहिला पाहिजे, त्याचे योग्य जतन झाले पाहिजे, जेणेकरून येथील पर्यटन वाढून रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, असेही भंडारी यांनी स्पष्ट केले.
मराठीतील पहिल्या शिलालेखाचा वनवास संपणार!
By admin | Published: February 27, 2015 10:25 PM