मुंबई : आता नम्रपणे नमस्कार करताहेत, या दोघांनी एकोणीसच्या निवडणुकीत मला पाडण्यासाठी काय काय केले ते माझ्या लक्षात आहे. भाजपचे एक आमदार सदर प्रतिनिधीला सांगत होते. तीन पक्ष सत्तेत तर एकत्र आले पण त्यांच्या पदाधिकारी व खालच्या नेत्यांमध्ये अजूनही मनोमिलन झाले नसल्याचा प्रत्यय महायुतीच्या मुंबईतील बैठकस्थळी येत होता.
पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या एका आमदारांना राष्ट्रवादीच्या त्यांच्या मतदारसंघातील दोन नेत्यांनी नमस्कार केला. त्यांची पाठ वळताच, आता नमस्कार करताहेत, यांचा काही भरवसा नाही, अशी सावध प्रतिक्रिया त्या आमदारांनी दिली. खासगी गप्पांत जुने हिशेब बरेच जण काढत होते. मुख्य रोष अर्थातच राष्ट्रवादीवर होता.
व्यासपीठावर नेते एकत्र, कार्यकर्ते गटागटांत व्यासपीठावर नेत्यांचे स्वागत करताना एका पक्षाच्या नेत्याचे स्वागत अन्य पक्षाच्या नेत्यांकडून व्हावे याची दक्षता घेतली जात होती. खाली मात्र, तिन्ही पक्षांचे नेते आपापले गट करून वेगवेगळ्या जागी बसलेले होते. तिन्ही पक्षांचे नेते एकाच ठिकाणी बसून आहेत हे चित्र दोन-तीन जिल्ह्यांबाबतच दिसत होते. तीन प्रमुख पक्षांबरोबरच लहान मित्रपक्षांच्या नेत्यांनाही सन्मानाने व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते.
होती आढावा बैठक, पण झाला मेळावाबैठकीत लोकसभा मतदारसंघाचा आढावा विभागनिहाय घेतला जाईल असे आधी जाहीर केले होते पण तसे काहीही झाले नाही. उपराष्ट्रपतींच्या दौऱ्याचे कारण दिले गेले. आढावा बैठक मेळाव्यात बदलली. महायुती म्हणून एकसंधपणे आपल्याला समोर जायचे आहे असे आवाहन नेते कळकळीने करत होते पण मनोमिलनाची सुरुवात अद्याप झालेली नाही हे बैठकस्थळी तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी बोलताना जाणवत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीसाठी सभागृहात आले तेव्हा राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी, एकच वादा अजितदादा अशी घोषणा दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले तेव्हा आणि त्यांच्या भाषणावेळीही शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी झाली. देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी आणि ते आले तेव्हाही भाजपजनांनी, ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. तिन्ही नेत्यांसाठी एकत्रित घोषणा मात्र आल्याच नाहीत. nराष्ट्रवादीचा जोश जरा जास्तच दिसत होता. अशी वेगवेगळी घोषणाबाजी होत असल्याचे बघून की काय देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा देत सभागृहात घोषणाऐक्य आणले.