मुंबई : श्रीरामपूर येथील किसानकनेक्ट या ऑनलाईन माध्यमातून शेतातून घरपोच भाज्या व फळे पुरविणाऱ्या शेतकरी मंचाने एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचेे ठरविले आहे. किसानकनेक्टचे शेतकरी बंधू आपल्या शेतातील ताजी व शोभिवंत अशी शेकडो झेंडूची फुले मुंबई व पुण्यातील सुमारे दोन हजार परिवारांना गणरायाच्या पूजनासाठी पाठविणार आहेत व त्याद्वारे या सर्व परिवारांच्या गणेशपूजनामध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील अशाप्रकारचा गणेशपूजेचा हा पहिलाच व मोठा उपक्रम आहे.
किसानकनेक्टने संपूर्ण गणेशोत्सवकाळात भाजीपाला, फळे व घरगुती खाद्यपदार्थ मागवणाऱ्या सर्व लोकांच्या घरी झेंडूची फुले पोच करण्याचे ठरविले असून ही फुले भाजीपाला व फळांच्या बास्केट्समधून पाठविली जातील. गणेशपूजेसाठीची ही फुले किसानकनेक्ट विनामूल्य पाठविणार असून त्यातूनच या सर्व लोकांच्या घरी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासात सहभागी होणार आहे. ही फुले गणपतीच्या पूजेसाठी किंवा सजावटीसाठी वापरता येऊ शकतील.
या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलताना किसानकनेक्टचे कृषी शास्त्रज्ञ डाॅ. विनोद गुंजाळ म्हणाले की, या नावीन्यापूर्ण व महाराष्ट्रातील पहिल्या अशा प्रकारच्या उपक्रमाने आम्ही मुंबई व पुण्यातील सुमारे दोन हजार परिवारातल्या गणेशोत्सवात सहभागी होऊ शकणार आहोत. या पूजेसाठी पवित्र मानली गेलेली झेंडूची फुले आमच्या शेतकऱ्यांच्या शेतातून थेट ताज्या पद्धतीत पूजा म्हणून पाठविणार आहोत. यातून आम्ही कुटुंबांच्या आनंदात सहभागी होऊ."
गणेशोत्सवाच्या काळात किसानकनेक्टच्या भाजीपाला व फळांच्या मागणीत प्रचंड वाढ अपेक्षित आहे. या काळात किसानकनेक्टचे शेतकरी बंधू विविध प्रकारच्या ताज्या, आरोग्यदायी व खाण्यासाठी सुरक्षित अशा भाज्या, फळे आपल्या ऑनलाईन मंचातर्फे किसानकनेक्टच्या ॲपच्या व वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना पुरविणार आहेत.
गणेशोत्सवासाठी किसानकनेक्टतर्फे श्रीरामपूर येथे चालविल्या जाणाऱ्या महिलांच्या व महाराष्ट्रातील पहिले ग्रामीण किचन असलेल्या 'माॅम्स किचन'च्यावतीने विशेष गणेश पूजा बास्केट्स, गौरीसाठी मिठाई, गणपती नैवेद्य यांचाही पुरवठा केला जाणार आहे. त्यामध्ये गणपतीसाठी नैवेद्यासाठी व उत्सवासाठी लागणारे चविष्ट मोदकही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे गणपतीच्या सणाची लज्जत अधिकच वाढेल असा आत्मविश्वास किसानकनेक्टच्या बंधूंना आहे.