अकरावीची पहिली यादी जाहीर
By admin | Published: July 3, 2014 02:12 AM2014-07-03T02:12:34+5:302014-07-03T02:12:34+5:30
मुंबई महानगर क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. पहिल्या गुणवत्ता यादीत १ लाख ७ हजार ३५६ विद्यार्थ्यांना पहिले पाच पसंतीक्रम मिळाले आहेत. तर ४४ हजार ८०६ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीक्रम मिळाला आहे. दहावी निकालाची टक्केवारी वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत गुणवत्ता यादीत २ ते ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी २ लाख ३ हजार ३७८ अर्ज आले होते. बुधवारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत ४४ हजार ८०६ विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात नमूद केलेले प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय मिळाले आहे. तर २३ हजार १५८ विद्यार्थ्यांना दुसऱ्या, १६ हजार २११ विद्यार्थ्यांना तिसऱ्या, १२ हजार ५१७ विद्यार्थ्यांना चौथ्या आणि १० हजार ६६४ विद्यार्थ्यांना पाचव्या क्रमांकाचा पसंतीक्रम मिळाला आहे.
यंदा दहावीचा निकाल विक्रमी लागल्याने अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुणवत्ता यादीत २ ते ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ३ ते ५ जुलैपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश निश्चित करताना विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेची मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला तसेच राखीव कोट्यातील विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रे सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)