लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दहावीनंतरच्या इंजिनीअरिंग डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी अंतिम गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयांची प्रवेशक्षमता सोमवारी प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पर्याय १६ सप्टेंबरपर्यत भरावे लागणार आहेत; तर १८ सप्टेंबरला महाविद्यालयांचे अलॉटमेंट जाहीर होणार आहे. महाविद्यालयांचे पर्याय न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट होणार नाही, असे ‘डीटीई’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. १९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश ऑनलाइन पद्धतीने कन्फर्म करावे लागणार आहेत. तर २३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयांत जाऊन कागदपत्रे आणि शुल्काच्या आधारे प्रवेश निश्चित करायचा आहे.
------------------
विशेष फेरीकडे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये अर्ज केलेल्या १ लाख १० हजार ४६१ विद्यार्थ्यांपैकी ३९ हजार ९६४ विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या यादीनंतर सुमारे ७० हजार ४९७ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांचे आता विशेष फेरीकडे लक्ष लागले आहे. तिसऱ्या यादीसाठी उपलब्ध असलेल्या १ लाख १९ हजार ३३३ जागांसाठी १ लाख १० हजार ४६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामध्ये वाटप झालेल्या ३९ हजार ९६४ जागांपैकी २५ हजार ५३९ जागा वाणिज्य शाखेसाठी, ११ हजार ५७ जागा विज्ञान शाखेसाठी तर कला शाखा ३१५२ आणि एचएसीव्हीसी अभ्यासक्रमासाठी २१५ जागांचे वाटप झाले आहे.