शहापूर, दि. 2 - दुरांतो एक्स्प्रेसचा अपघात झाल्याने ठप्प झालेली आसनगाव ते टिटवाळादरम्यान वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. दरम्यान आसनगावहून वाशिंदकडे पहिली लोकल रवाना करण्यात आली आहे. आसनगाव आणि वाशिंद दरम्यानचा अप ट्रॅक दुरुस्त करण्यात आला आहे. 29 तारखेला दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याने वाहतूक पुर्णपणे ठप्प होती. तब्बल 98 तासानंतर वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली आहे.
मध्य रेल्वेच्या आसनगाव आणि वाशिंदरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचे डबे मंगळवारी घसरले होते. त्यानंतर कल्याण-कसारा या मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक तब्बल ७२ तासांनंतरही पूर्वपदावर आलेली नव्हती. यामुळे संतापलेल्या रेल्वे प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी साडे सातच्या सुमारास वाशिंद स्थानकावर रेल रोको केला होता. रुळावर उतरून दादर-अमृतसर ही गाडी वाशिंदजवळ रोखून धरली होती.
सलग चौथ्या दिवशी वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचा उद्रेक झाला होता. रेल्वेच्या गोंधळामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, वाशिंद-कसारादरम्यान राहणाºया नोकरदारांना मुंबईत कामावर हजर होणे शक्य होत नव्हते.
एक्स्प्रेसऐवजी वाशिंद ते सीएसएमटी लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी केली होती. वाशिंद ते कल्याणदरम्यान रेल्वेमार्ग सुस्थितीत असूनही रेल्वे प्रशासन लोकल का सुरू करीत नाही, असा संतप्त सवाल प्रवासी रेल्वे अधिकाºयांना करीत होते.
मंगळवारी आसनगावहून सीएसएमटीच्या दिशेने पहाटे ६ वाजून २५ मिनिटांनी लोकल रवाना झाली. हीच आसनगाव येथून सीएसएमटीच्या दिशेने येणारी शेवटची लोकल ठरली. दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्यानंतर आसनगाव आणि वाशिंददरम्यान रेल्वे रूळ नव्याने बसविण्यात आले. बुधवारी रात्री १२च्या सुमारास या मार्गावरून एक्स्प्रेस चालवण्यात आली. मात्र लोकल सेवा सुरू करण्यासाठी वेळ हवा, असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले होते.