लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सगेसोयरे अध्यादेश राज्य शासनाने तत्काळ काढावा, या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात नवरा-नवरीनेही आंदोलनात सहभाग घेतला.
सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ व कोंडी येथे आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. मोहोळजवळील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत बोहल्यावर चढण्याअगोदर नवरा-नवरीने महामार्गावर भर उन्हात ठिय्या आंदोलन करीत लक्ष वेधले.छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांतही आंदोलनात मराठा समाजाने सहभाग घेतला.
पेटवून घेण्याचा प्रयत्नलातूर-बार्शी रोडवर पाच नंबर चौकात आंदोलन सुरू असताना दुपारी एका तरुणाने स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. लातूर जिल्ह्यात जवळपास ९ ठिकाणी रास्ता रोको आंंदोलन करण्यात आले.
८८ बसफेऱ्या रद्दजालना जिल्ह्यात ६० ठिकाणी तर बीड जिल्ह्यात १८ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे एसटी बसच्या ८८ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. हिंगोली, परभणी नांदेड, बुलढाणा, अकोला जिल्ह्यातही आंदोलन झाले. अहमदनगरमध्ये मनमाड, पुणे आणि पाथर्डी महामार्गावर दोन तास रस्ता रोको करण्यात आला.