मुंबई : मुलुंडमध्ये एका कंपनीत संचालक म्हणून सहभागी करून घेत व्यावसायिकाची ११ कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून मुलुंड पोलिसांनी कंपनीसह एका नामांकित बँकेच्या माटुंगा शाखेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. कंपनीच्या संचालक कुटुंबीयांनीबँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही फसवणूक केल्याचा आरोप व्यावसायिकाने केला आहे.
अंधेरी परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय तक्रारदार व्यावसायिक राजेश बजाज यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, दाखल गुन्ह्यातील विनोद रुपानी, राजेश रुपानी, दाैलत रुपानी, स्नेहा रुपानी संचालक असलेल्या मुलुंडमधील रहिवासी कुटुंबीयांची आर्चिव्हर्स एक्झिम प्रा. लि. नावाची एक खासगी कंपनी असून, ती मायक्रोसाॅफ्टची अधिकृत डीलर कंपनी आहे. कंपनीला पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून बोरिवलीतील एका व्यक्तीने कंपनीच्या संचालकांशी ऑगस्ट २०१७ मध्ये भेट घालून दिली.
कंपनीचा रेकॉर्ड चांगला वाटल्याने त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी राजेश यांनी कंपनीत संचालक होण्याचा प्रस्ताव ठेवताच त्यांना पाच कोटींची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी त्यांच्या कांदिवलीतील स्थावर मालमत्ता कंपनीकडे ठेवण्याचा निर्णय घेतला.
पुढे त्यांच्या वहिनींनाही गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्याही संचालक झाल्याचे नमूद केले. पुढे राजेश यांच्या वहिनीच्या नावावर असलेली मालमत्ता आयसीआयसीआय बँकेच्या माटुंगा येथील शाखेत कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून ठेवून ६.५ कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट आणि दोन कोटी रुपयांची लेटर ऑफ क्रेडिट घेतले. याच पैशांच्या आधारे रुपानी यांच्या कंपनीने एका मोबाइल कंपनीचे नाशिक जिल्ह्यासाठी डिस्ट्रिब्यशनचे काम घेतले. पुढे रुपानी यांनी राजेश आणि त्यांच्या वहिनीच्या नकळत त्यांच्या कांदिवलीतील मालमत्तेचे ६.५ कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट वाढवून ८.५ कोटी केले. ही रक्कम त्यांनी व्यवसायात न वापरता एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची थकीत रक्कम भरण्यासाठी वापरली.