मुंबई: मुंबईतील लहान मुलांमधील कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी सायन रुग्णालयात स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात मेडिकल न्यूट्रिशन थेरपीच्या (एमएनटी) सहाय्याने कुपोषित मुलांवर उपचार केले जाणार आहेत. अशाप्रकारचा देशातला पहिलाच उपक्रम आहे.चार वर्षांपूर्वी धारावीत कुपोषित मुलांसाठी ‘उपचार ममता आहार’ म्हणजेच ‘उमा’ केंद्र सुरू करण्यात आले. सायन रुग्णालयाच्या बालरोग विभागाने पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला युनिसेफकडून मिळालेल्या आर्थिक मदतीतून कुपोषणासाठी उभारलेल्या विशेष बाह्यरुग्ण विभागाचे मंगळवार, २८ एप्रिलला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, प्रमुख रुग्णालये संचालिका डॉ. सुहासिनी नागदा आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, पत्रकार नीरजा चौधरी, युनिसेफच्या डॉ. राजेश्वरी चंद्रशेखर, राजी नायर, डॉ. मृदुला फडके, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आणि सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट उपस्थित होते.आयुक्त अजोय मेहता यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. महापालिकेच्या रुग्णालयात कुपोषणासाठी होत असलेले काम स्तुत्य आहे. येथील डॉक्टर झोकून देऊन काम करीत आहेत, याचा मला अभिमान वाटतो. कुपोषणासारख्या समस्येवर सोप्पा विचार करून त्यांनी मार्ग काढला आहे. सध्या आपण सगळेच सोपा विचार करालया विसरतो, असे अजोय यांनी सांगितले. २००९ मध्ये पहिल्यांदा बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. ममता मंगलानी आणि त्यांच्या सहकारी डॉ. अलका जाधव यांनी कुपोषित मुलांना पोषक आहार द्यावा म्हणून कामाला सुरूवात केली. यातूनच शेंगदाण्याची पेस्ट, सोया तेल, स्किम मिल्क पावडर आणि आवश्यक पोषक तत्त्वांचा वापर करून त्यांनी एक खुराक (एमएनटी) तयार केला. १ एप्रिल २०१० मध्ये खुराक तयार करण्याचे देशी बनावटीचे युनिट तयार झाले. धारावीच्या बरोबरीनेच सामाजिक संघटनांच्या मदतीने देवनार, गोवंडी आणि कांदिवली येथील मोहल्ल्यात काम सुरू आहे. उमा केंद्रात प्रत्येकवर्षी हजार ते बाराशे मुलांवर उपचार केले जातात.च्टेलिमेडिसीनच्या माध्यामातून सोडवणार कुपोषणाची समस्या मेडिकल न्यूट्रिशन थेरपीच्या माध्यमातून सोडवण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे. आमच्याकडच्या तज्ज्ञांचा उपयोग जिल्हास्तरीय पातळीवर व्हावा म्हणून टेलिमेडिसीनचा वापर केला जाणार आहे. पुढच्या काही दिवसांत ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवरील रुग्णालयांतील डॉक्टरांच्या कुपोषणासंदर्भातल्या समस्या सोडवण्यात येणार असल्याचे डॉ. अलका जाधव यांनी सांगितले.
देशातील पहिला कुपोषण बाह्यरुग्ण विभाग सायनमध्ये
By admin | Published: April 29, 2015 1:05 AM