विरोधी नेत्याविनाच पहिली बैठक
By admin | Published: March 18, 2017 04:28 AM2017-03-18T04:28:48+5:302017-03-18T04:28:48+5:30
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेली स्थायी समितीची पहिलीच बैठक कचरा, गाळ, पाणी, रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी वर्गाची भरती
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेली स्थायी समितीची पहिलीच बैठक कचरा, गाळ, पाणी, रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचारी वर्गाची भरती आणि रुग्णालयातील अन्नाचा दर्जा या मुद्द्यांनी गाजली. पश्चिम उपनगरातील पाण्याच्या प्रश्नासह गाळ टाकण्यासाठीचा भूखंड या दोन प्रमुख मुद्द्यांना हाती धरत स्थायी समितीच्या सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. विशेष म्हणजे सदस्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर प्राप्त न झाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त करत या प्रश्नी ठोस कार्यवाही करण्यात यावी, असा सूर लगावला. तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीत क्रमांक दोनचा पक्ष ठरलेल्या भाजपाने विरोधी पक्षनेता पदासह सर्वच समित्यांना दोन हात दूर ठेवल्याने स्थायी समितीची पहिलीच बैठक विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडली.
स्थायी समितीच्या बैठकीची सुरुवातच गाळ आणि कचरा या विषयाने झाली. भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी गाळ अथवा कचरा नेमका कुठे टाकला जातो, अशा आशयाचे मुद्दे मांडत प्रशासनाला धारेवर धरले. नालेसफाईत घोटाळे झाल्यानंतरही नालेसफाईबाबत प्रशासन गंभीर नाही. परिणामी जेथे गाळ टाकला जातो त्या ठिकाणची पाहणी करण्यात यावी, अशा आशयाची मागणी त्यांनी केली. भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनीही प्रशासनावर टीकेची झोड उठवली. गाळ अथवा कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने ही कामे स्वयंसेवी संस्थेला द्यावीत. अथवा ठोस असा कृतिशील कार्यक्रम राबवावा, असे म्हणणे मांडले. शिवसेनेचे आशिष चेंबूरकर यांनीही या प्रश्नावर आवाज उठवला. गाळाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाकडे नियोजन नाही, अशी टीका करत नियोजन करण्यात यावे, असे ते म्हणाले.
शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी बैठकीत कूपर रुग्णालयासह उर्वरित महापालिकेच्या रुग्णालयांतील अपुऱ्या कर्मचाऱ्यांविषयीचा मुद्दा मांडत प्रशासनाला धारेवर धरले. (प्रतिनिधी)
६१ हजार कोटींच्या ठेवींची माहिती देणार
- मुंबई महापालिकेच्या ६१ हजार कोटींच्या ठेवींची माहिती सादर करण्याचे आदेश महापालिका सभागृहाने प्रशासनाला दिले असून, शनिवारी याबाबतची माहिती सभागृहात सादर केली जाणार आहे.
- बेस्ट कर्मचारी वर्गाचे वेतन रखडले असतानाच महापालिका ठेवींचे नेमके काय करते, असा सवालही नगरसेवकांनी केला आहे. पायाभूत सेवा-सुविधांसाठी या ठेवी वापरल्या जाव्यात, असे म्हणणे नगरसेवकांनी मांडले आहे.
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेचे ६१ हजार ५१० कोटी रुपये शहरातील ३१ बँकांमध्ये जमा असून, यात ४ खासगी बँकांचा समावेश आहे. दुसरीकडे या रकमेच्या व्याजापोटी महापालिकेला ४ हजार ५०० कोटी रुपये मिळतात.
- दरम्यान, महापालिकेच्या ६१ हजार ५१० कोटींच्या रकमेमध्ये भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती निधी, अतिरिक्त निधी आणि नागरी विशेष निधीचा समावेश आहे.
पारदर्शक कामकाज
स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी यासंदर्भातील विषयांची प्रत सदस्यांंना मिळणे अपेक्षित आहे, सदस्यांच्या ई-मेल आयडीवर अथवा वेबपोर्टलवर प्रत उपलब्ध झाली तर बैठकीतील मुद्दे सदस्यांना समजतील. शिवाय विषय समजल्याने कामकाज पारदर्शक होईल, असा टोला सपाचे रईस शेख यांनी लगावला़
अधिकाऱ्यांची दांडी
स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीला खातेप्रमुखांसह अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित खात्याचा प्रश्न अथवा मुद्दा बैठकीत चर्चेला आल्यानंतर यावर उत्तर देण्यासाठी प्रशासनाचा प्रतिनिधीच उपस्थित नसेल चर्चेला अर्थ राहत नाही, असे म्हणणे सदस्यांनी मांडले.
मुंबईत दिवसाला सुमारे नऊ हजार मेट्रिक टन कचरा गोळा होतो. हा कचरा देवनार डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. कांजूरमार्ग येथे तब्बल तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रकिया केली जाते. वर्षभरात एक हजार मेट्रिक टनातून कंपोस्ट तयार केले जाणार आहे. गाळ टाकण्यासाठीच्या जागा शोधल्या आहेत. संबंधित ठिकाणी गाळ टाकला जातो. - पल्लवी दराडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त