पहिल्या भुयारी मुुंबई मेट्रो-३चे काम वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 02:31 AM2019-02-12T02:31:17+5:302019-02-12T02:31:30+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो-३ चे काम अत्यंत वेगाने सुरू असून, ताज्या आकडेवारीनुसार एकूण सात टप्प्यांतील ५३ हजार ७९२ मीटरपैकी १९ हजार ३८७.६ मीटरचे भुयार पूर्ण झाले आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो-३ चे काम अत्यंत वेगाने सुरू असून, ताज्या आकडेवारीनुसार एकूण सात टप्प्यांतील ५३ हजार ७९२ मीटरपैकी १९ हजार ३८७.६ मीटरचे भुयार पूर्ण झाले आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केलेल्या टिष्ट्वटनुसार, मेट्रो-३च्या टप्पा एक अंतर्गत कफ परेड ते सीएसएमटीदरम्यान ५ हजार ८९४ मीटरपैकी १ हजार २०० मीटर भुयाराचे काम पूर्ण झाले आहे. टप्पा दोन अंतर्गत सीएसएमटी ते मुंबई सेंट्रलदरम्यान ७ हजार ६४० मीटरपैकी ३ हजार ४३९ मीटर भुयाराचे काम पूर्ण झाले आहे. टप्पा तीन अंतर्गत मुंबई सेंट्रल ते वरळीदरम्यान ७ हजार २९० मीटरपैकी ४८६ मीटर तर टप्पा चारअंतर्गत वरळी ते धारावीदरम्यान १० हजार ९६० मीटरपैकी ५ हजार ९७६.६ मीटर भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
टप्पा पाचअंतर्गत धारावी ते सांताक्रूझ येथील आग्रीपाड्यादरम्यान ७ हजार ९९२ मीटरपैकी ३ हजार ६२८ मीटर, टप्पा सहाअंतर्गत आग्रीपाडा ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान (टी-२) ६ हजार ९३७ मीटरपैकी १ हजार १९७ मीटर तर टप्पा सातअंतर्गत टी-२ ते सारीपूत नगरदरम्यान ७ हजार ७९ मीटरपैकी ३ हजार ४६१ मीटर भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
मुंबई मेट्रो-३ प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर सुमारे १६ लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकूलित डब्यातून प्रवास करणे शक्य होईल. प्रवासाच्या वेळेत घट, ध्वनी व हवेच्या प्रदूषणात घट, सुरक्षित व आरामदायी प्रवास अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध होतील. मेट्रोचा हा मार्ग महत्त्वपूर्ण व्यावसायिक केंद्रांशी, शैक्षणिक संस्था, मनोरंजनाची ठिकाणे तसेच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जाईल.
असे सुरू आहे खोदकाम
बोगदे खोदाई यंत्र : ड्रिलिंगसाठी पर्याय म्हणून ही अत्याधुनिक पद्धत वापरण्यात येते. गोल आडवा छेद देताना छेदन व विस्फोटन पद्धतीला पर्याय म्हणून हे यंत्र वापरले जाते.
छेद व आच्छादन : जमिनीस छेद देऊन पुन्हा आच्छादित केले जाते अशी ही बांधकामाची पद्धत आहे.
नवीन आॅस्ट्रियन बोगदे खोदाई किंवा आधुनिक बोगदा बांधकाम पद्धत : यामध्ये खडक किंवा माती गोलाकार पद्धतीने खणून बोगदा तयार केला जातो.
लिफ्ट्स उभारणी...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत आरे डेपो ते दादर आणि ओसीसी बिल्डिंगदरम्यान एकूण १३ स्थानकांमध्ये उद्वाहक (लिफ्ट्स) यंत्रणा उभारण्यासाठी क्रेनेक्स अँड आयएफई या समूहाची निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रियेद्वारे जायकाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही निवड करण्यात आली आहे.
क्रेनेक्स हे कंत्राटदार मेट्रो-३च्या १३ स्थानके आणि ओसीसी बिल्डिंगच्या एकूण ७६ उद्वाहक (लिफ्ट्सचे) आरेखन, उत्पादन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंग अशा प्रकारची कामे करणार आहेत.
जास्त प्रवासी वाहून नेण्याची क्षमता, ऊर्जाबचत करणारे रिजनॅरेटिव्ह ड्राइव्ह, वेब बेस्ड रियल टाइम मॉनिटरिंग आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याची संरचना करण्याकरिता वापरली जाणार आहे.
आरामदायी सुविधा
सर्वोत्तम उद्वाहक (लिफ्ट्स) यंत्रणा ही मेट्रो-३ साठी अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. याद्वारे प्रवाशांना सर्वोत्तम आरामदायी सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक उद्वाहक यंत्रणेची उभारणी करण्यासाठी कॉर्पोरेशन कटिबद्ध आहे.
- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल