मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुतेक देशांमध्ये वापरली जाणारी ओपन रोड टोल सिस्टीम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात येणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर लागू केली जाईल. त्यामुळे टोलसाठी गाडीचा वेग कमी करावा लागणार नाही किंवा टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही.
टोल परस्पर खात्यातून वळता होईल. त्यामुळे टोलनाक्यांवर होणारी कोंडीही टळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या पुलाच्या कामासाठी ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅनची उभारणी केल्यानंतर ते बोलत होते. या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. हा प्रकल्प वर्षाखेरीस पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
ओपन रोड टोल कसा वसूल करणार ?
सध्याच्या टोलच्या पद्धतीपेक्षा ओपन रोड टोल आधुनिक मानला जातो. गाडीचा वेग कमी न करता हा टोल वसूल केला जातो. टोलसाठी उभ्या केलेल्या कॅमेऱ्यांखालून गाडी गेली की, तिची नंबरप्लेट स्कॅन होईल. त्यावरून गाडी ओळखली जाईल. गाडीच्या मालकाला टोलसाठी आपले बँक खाते गाडीच्या नंबरशी जोडावे लागेल. ती गाडी ज्या बँक खात्याला जोडलेली आहे, त्या खात्यातून टोलची रक्कम वळती केली जाईल. सध्या ही व्यवस्था सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती, कॅनडासारख्या काही देशांत लागू आहे. यामुळे टोलनाक्यांजवळ होणारी गर्दी टाळता येईल.