राज्यातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ मोहीम अखेर झाली फत्ते!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:20 AM2021-04-25T00:20:45+5:302021-04-25T00:20:58+5:30
कळंबोली ते विशाखापट्टणम अन् विझाग ते नाशिकपर्यंत धावली
मुंबई : रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेसची वाहतूक एक आव्हान म्हणून स्वीकारत कळंबोली ते विझाग आणि विझाग ते नाशिकपर्यंत पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस यशस्वीरीत्या चालविली. यामुळे ऑक्सिजनचा वेळेत पुरवठा होणे शक्य झाले आहे.
सरकारने ऑक्सिजन टँकरच्या वाहतुकीसाठी रेल्वेला विनंती करताच रेल्वेद्वारा विविध ठिकाणी त्वरित रॅम्प बनविण्यात आले. मुंबई विभागाच्या टीमने कळंबोली येथे फक्त २४ तासांत रॅम्प बनविण्याचे कौतुकास्पद काम केले. रो-रो सेवेच्या वाहतुकीसाठी रेल्वेला घाट सेक्शन, रोड ओव्हर ब्रिज, बोगदे इत्यादी ठिकाणांच्या बाधा लक्षात घेऊन संपूर्ण मार्गाचा नकाशा बनवायचा होता. कारण उंची ही यातील महत्त्वाची बाब असल्याने रेल्वेने वसईमार्गे वाहतुकीचा नकाशा तयार केला. उंची ३,३२० मिमी असलेले रोड टँकर टी १६१८ चे मॉडेल सपाट वॅगन्सवर ठेवणे शक्य असल्याचे आढळले.
मुंबई विभागातील घाट विभागात ओव्हर डायमेंशनल कार्गो (ओडीसी) चालविण्याची परवानगी नसल्यामुळे वसईमार्गे जाणाऱ्या दूरच्या मार्गाची निवड करण्यात आली होती. ऑक्सिजन हे क्रायोजेनिक आणि घातक रसायन असल्याने, रेल्वेला अचानक वेग वाढवणे, कमी करणे हे टाळण्याच्या आवश्यकतेसह मध्येच दाब (प्रेशर) तपासणे आवश्यक असते. विशेषत: जेव्हा ते भरलेल्या (लोडिंग) अवस्थेत असते. तरीही रेल्वेने हे आव्हान म्हणून स्वीकारले, मार्गाचे नकाशे तयार केले, लोकांना प्रशिक्षण दिले.
लांब पल्ल्यांसाठी ऑक्सिजनची वाहतूक रेल्वे गाड्यांद्वारे रस्ते वाहतुकीपेक्षा जलद होते. रेल्वेमार्गाने वाहतुकीस २ दिवस तर रस्त्यामार्गे ३ दिवस लागतात. रेल्वेगाड्या २४ तास धावू शकतात; परंतु ट्रकचालकांना थांबा इ. घेण्याची गरज असते. या टँकरच्या वेगवान वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केले गेले होते आणि हालचालींचे निरीक्षण सर्वोच्च पातळीवर केले गेले होते.