आधी पेपर इंग्रजी की हिंदीचा? दहावी परीक्षेच्या हॉल तिकिटावरील चुकीमुळे पालकांत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:53 AM2023-02-10T10:53:15+5:302023-02-10T10:54:10+5:30

येत्या २ मार्चपासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची दहावीची परीक्षा सुरू होत असून येत्या २५ मार्चपर्यंत ती सुरू राहणार आहे.

First paper English or Hindi Confusion among parents due to mistake on hall ticket of 10th exam | आधी पेपर इंग्रजी की हिंदीचा? दहावी परीक्षेच्या हॉल तिकिटावरील चुकीमुळे पालकांत संभ्रम

आधी पेपर इंग्रजी की हिंदीचा? दहावी परीक्षेच्या हॉल तिकिटावरील चुकीमुळे पालकांत संभ्रम

googlenewsNext

मुंबई : शाळांमध्ये सोमवारपासून दहावीच्या परीक्षांसाठी हॉल तिकीट मिळण्यास सुरुवात झाली. मात्र मराठी माध्यमाच्या हॉल तिकिटावर हिंदी आणि इंग्रजी विषयांच्या पेपरचा क्रम वर-खाली झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. मूळ वेळापत्रकाप्रमाणे इंग्रजी विषयाचा पेपर ६ मार्च रोजी आहे, तर हिंदी विषयाचा पेपर ८ मार्च रोजी आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या मराठी माध्यमाच्या परीक्षांच्या क्रमानुसार मराठीनंतर हिंदी आणि इंग्रजीचा पेपर असतो. मात्र हॉल तिकिटावर इंग्रजीचा ८ तारखेचा पेपर आधी आणि इंग्रजीचा ६ तारखेचा पेपर त्यानंतर असा क्रम छापण्यात आला आहे. पेपर्सच्या तारखा चुकल्या नसल्या तरी विषयांचा क्रम चुकल्याने गोंधळ होण्याची भीती पालक व्यक्त करीत आहेत.

येत्या २ मार्चपासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची दहावीची परीक्षा सुरू होत असून येत्या २५ मार्चपर्यंत ती सुरू राहणार आहे. याचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना सोमवारपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकिटांचे वाटप करताना अनेक शिक्षकांच्या विषयांचा क्रम बदलल्याचे लक्षात आले आहे; शिवाय पालकांच्याही ते लक्षात आले. पेपरची तारीख चुकली नाही. मात्र परीक्षांच्या वेळेस विद्यार्थी केवळ उद्या कोणता विषय असा विचार करून विषय पाहतात आणि तयारी करतात. अशा वेळेस विद्यार्थ्यांकडून चूक झाल्यास मंडळाची ही ‘प्रिंटिंग मिस्टेक’ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यास जबाबदार ठरू शकते, अशी भीती पालक व्यक्त करीत आहेत.

सुधारित पत्रक काढावे
शिक्षकांच्या आणि पालकांच्या मतानुसार मंडळाने या संदर्भात सुधारपत्र जारी करणे आवश्यक आहे. प्रिंटिंग गोंधळ असला तरी मंडळाकडून अशी चूक होणे अपेक्षित नसल्याच्या प्रतिक्रिया ते देत आहेत. या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Web Title: First paper English or Hindi Confusion among parents due to mistake on hall ticket of 10th exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.