Join us  

झिका व्हायरसचा पहिला रुग्ण मुंबईत; आरोग्य यंत्रणा अलर्ट, काय आहेत लक्षणे?

By संतोष आंधळे | Published: August 23, 2023 7:49 PM

या रुग्णाला १९ जुलै रोजी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे होती आणि त्यांनी खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतले होते

मुंबई - मुंबईतील चेंबूर परिसरात प्रथमच झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. ७९ वर्षीय रुग्णामध्ये हा व्हायरस आढळून आला असून त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग थॅलेसेमिया हे आजार असून त्यांच्यावर २० वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांना काही दिवसापूर्वी सौम्य ताप आल्याने त्यांनी विषाणूसंबंधित चाचण्या त्यांच्या डॉक्टरांनी केल्या होत्या.  त्या  तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल व्हायरल इन्टिट्यूट मध्ये पाठविण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल आता असून त्याच्या चांचण्यामध्ये झिका व्हायरस आढळून आला असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.  मुंबईत झिका व्हायरसचा आढळलेला हा पहिला रूग्ण आहे

या रुग्णाला १९ जुलै रोजी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे होती आणि त्यांनी खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतले होते. २ ऑगस्ट रोजी रुग्णाला बरे होऊन घरी  सोडण्यात आले. त्यावेळी त्यांच्या डॉक्टरांनी काही उपचाराचा भाग म्ह्णून काही चाचण्या केल्या होत्या. त्यातील काही चाचण्यांच्या तपासणीसाठी ते पुणे येथील व्हायरॉलॉजी इन्टस्टिट्युट मध्ये पाठविण्यात आले  होते. झिका आजार हा झिका व्हायरसमुळे होणार सौम्य आजार आहे. हा आजार संक्रमित एडिस डासांमुळे होतो. एडिस डास चिकुनगुनिया आणि डेंग्यू आजराचाही प्रसार करतात. हा आजार विषाणूजन्य असला तरी कोव्हीड सारखा वेगाने पसरत नाही.   

महापालिकेतर्फे बाधित रुग्णाच्या घरचे सर्वेक्षण करण्यात आले असून कोणताही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. इमारतीच्या पार्किंगमध्ये आढळणारी एडिस  ब्रीडिंग आणि डास नियंत्रण उपाययोजना केल्या आहेत.         

काय आहेत लक्षणे?ताप, त्वचेवर पुरळ, डोळे येणे, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी - झिका हा एक स्वयं – मर्यादित आजार आहे. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींपैकी ८० टक्के व्यक्तींमध्ये लक्षणे नसतात. या आजाराच्या चाचणीची सुविधा मुंबई महानगरपालिकेत के ई एम रूग्णालयात उपलब्ध आहे. 

नागरिकांना आवाहन - -नागरिकांनी घाबरून जाऊ नये - डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सर्व पाण्याच्या टाक्या आणि कंटेनर घट्ट झाकणांनी झाकून ठेवा. - वापरात नसलेले सर्व कंटेनर, जंक मटेरियल, टायर, नारळाची करवंटी आदींची विल्हेवाट लावा. - साप्ताहिक कोरडा दिवस साजरा करा. आठवडाभर पाणी असणारे सर्व कंटेनर, फुलदाणी आदी रिकामे करा. 

वैयक्तिक संरक्षणासाठी - झिका विषाणूचा प्रसार करणाऱ्या डासांचा प्रतिबंध करण्यासाठी बेड नेटचा वापर करा - दिवसा डासांपासून बचावासाठी पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरा - डास प्रतिबंधात्मक बॉडी जेलचा वापर करा

टॅग्स :मुंबई