लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आरोग्य, महिला सक्षमीकरण, मुंबई सुशोभीकरण, मंड्या आणि कोळीवाड्यांच्या विकासासाठी सरकारने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. तसेच मुंबईत स्वच्छता, सुशोभीकरण, आपला दवाखाना यासारख्या नावीन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. भविष्यात मुंबईकरांना, तसेच ज्येष्ठ नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे, असे स्पष्ट करत शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी सायन पूर्व येथील जोडणाऱ्या पादचारी पुलाचे लोकार्पण केले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता ओलांडण्यासाठी सायन पूर्व येथे पूल बांधावा, अशी एफ उत्तर विभागातील नागरिकांची सातत्याने मागणी होती. त्यानुसार शीव येथे हा पूल बांधण्यात आला आहे. पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूला दोन सरकते जिने, सामान्य जिने आहेत. एकूण ४४ मीटर लांबीचा तर ४.१५ मीटर रूंदीचा हा पूल आहे. दिवसापोटी किमान ७ हजार ते ८ हजार नागरिक या पुलाचा वापर करतील. पूल बांधणीसाठी ५.६३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या पुलाचे काम ५२ महिन्यांत पूर्ण करण्यात आले. या पुलामुळे गांधी मार्केटला जाण्यासाठीची सुविधा उपलब्ध होणार असून, धारावीतून गांधी मार्केट आणि सायन कोळीवाडा येथे जाणाऱ्या नागरिकांना या पुलाचा फायदा होणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूक विनाअडथळा होण्यासाठीही या पुलाची मदत होणार आहे.
सोहळ्याप्रसंगी खा. राहुल शेवाळे, आ. आशिष शेलार, आ. कालिदास कोळंबकर, आ. कॅप्टन तमिल सेल्वन, आ. प्रसाद लाड, उपआयुक्त (परिमंडळ -२) रमाकांत बिरादार, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे उपस्थित होते.
बेस्ट उपक्रमाकडून दहा बसन्यूयॉर्क येथील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याच्या ठिकाणी बसने नेऊन त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवला जातो. याच धर्तीवर मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनाही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून बेस्ट बस देण्यात येणार आहेत. मुंबईतील कोळीवाड्यात स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ‘फूड ऑन ट्रक’ ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने व्यवसायासाठी जागाही पुरवणार असल्याचे सांगून मंड्यांमध्ये दर्जेदार सुविधेचा भाग म्हणून लोअर परळ येथे वातानुकूलित मंडई उपलब्ध करून देणार असल्याचेही केसरकर म्हणाले.