ठाणे : दिवाळीसाठी आता केवळ पाच दिवस शिल्लक असतानादेखील शहरात फटाक्यांचे स्टॉल अद्यापही लागले गेलेले नाहीत. पालिका, पोलीस, अग्निशमन विभाग आदींच्या परवानग्या घेऊन पालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणांवर अधिकृत फटाके स्टॉल लावण्यात येणार आहेत. परंतु, आता मागील वर्षांचे भाडे, यंदाचे भाडे आणि पुन्हा पाच हजारांचे डिपॉझिट अशा जाचक अटींमधून स्टॉलधारकांना जावे लागणार आहे. असे असले तरी, अद्याप प्रभाग समितींमध्ये फटाके स्टॉलचालक परवानगीसाठी खेटे घालत आहेत. रस्त्यांवर, फुटपाथवर कोणत्याही स्वरूपाची जीवित अथवा वित्ताहानी होऊ नये, म्हणून पालिकेने गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर आणि फुटपाथवर फटाक्यांचे स्टॉल लावण्यास बंदी केली आहे. हे स्टॉल लावायचे झाल्यास ठाणे महापालिकेची मैदाने, मोकळे भूखंड आदी ठिकाणी अशा प्रकारे ते लावले जात आहेत. यंदादेखील शहरात सुमारे २५० च्या आसपास स्टॉल लावले जाणार आहेत. परंतु, दिवाळीला केवळ पाच दिवसही राहिले नसताना अद्याप पालिकेने स्टॉलधारकांना परवानगी दिलेली नाही. विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी या स्टॉलधारकांना पालिकेची मैदाने आणि मोकळे भूखंड उपलब्ध करून दिले होते. परंतु, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे भाडे आकारण्यात येत नव्हते. दरम्यान, मागील वर्षी फटाके स्टॉल लावल्यानंतर भाडे आकारण्यास पालिकेने सुरुवात केली. परंतु, ऐनवेळेस सांगितल्याने स्टॉलधारकांनी ते देण्यास नकार दिला होता. (प्रतिनिधी)
आधी परवानग्या, मग जाचक अटी; फटाके विकायचे कधी?
By admin | Published: October 25, 2016 3:40 AM