बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण; नव्या वर्षात उद्घाटनाचा मार्ग खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 06:50 IST2024-12-26T06:49:47+5:302024-12-26T06:50:21+5:30

२३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होण्याची शक्यता

First phase of the Balasaheb Thackeray memorial is complete | बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण; नव्या वर्षात उद्घाटनाचा मार्ग खुला

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण; नव्या वर्षात उद्घाटनाचा मार्ग खुला

मुंबई: दादर येथील महापौर बंगल्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नव्या वर्षात त्याचे उद्घाटन करण्याचा मार्ग खुला झाला आहे. दरम्यान, २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एमएमआरडीएकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक है ११,८०० चौरस मीटर क्षेत्रफळावर साकारले जात आहे. या स्मारकाचे काम दोन टप्प्यांत केले जात आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे १८१ कोटी रुपये खर्चुन प्रवेशद्वार इमारत, संपर्क आणि माहिती कक्ष आणि प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. तसेच या स्मारकाच्या परिसरात असलेल्या ११५ वर्ष जुन्या महापौर बंगल्याच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

एमएमआरडीएने पहिल्या टप्यात महापौर निवासस्थानाच्या इमारतीचे जतन व संवर्धन केले असून, या परिसरातील तीन एकर जागेत बागबगिचा तयार करून त्याचे सुशोभीकरण केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात काय? 

महापौर निवासस्थानाच्या ६०२ चौ. मी. क्षेत्रफळावरील इमारतीचे जतन व संवर्धन केले आहे. 

प्रवेशद्वार इमारत ३१०० चौ.मी. क्षेत्रफळावर उभारली असून, तळ मजला आणि त्यावर दोन मजले आहेत. यात भूमिगत वाहनतळ असून, २७ कार पार्क करता येतात. दोन बहुउद्देशीय सभागृह आणि सुरक्षा नियंत्रण कक्ष आहे. संपर्क आणि माहिती कक्ष १५३० चौ. मी. क्षेत्रफळावर बांधले असून, तो भूमिगत आहे. यात तळघरात कलाकार दालन, संग्रहालय, ग्रंथालय यांचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यातील कामे 

दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानाचा वापर करून महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन करणारी छायाचित्रे, दृश्यचित्रे आणि त्यांचा राजकीय प्रवास दर्शवणारी माहिती प्रदर्शित केली जाईल. यामध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग, प्रोजेक्शन, व्हर्चुअल रिअलिटी, हार्डवेअर आणि साहाय्यभूत सेवा, तंत्रज्ञान विषयक कामे होणार आहे. एमएमआरडीएने या कामासाठी सल्लागार म्हणून आभा लांबा असोसिएटची नियुक्ती केली आहे. तर कंत्राटदाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: First phase of the Balasaheb Thackeray memorial is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.