नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 08:13 AM2024-09-25T08:13:08+5:302024-09-25T08:13:20+5:30

मुंबईकरांना या मार्गावरून आरे ते बीकेसी या प्रवासासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

first phase of the Colaba to Seepz Metro 3 route will be opened for traffic during Navratri the first week of October | नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

मुंबई : बहुप्रतीक्षित कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिला टप्पा नवरात्रात-ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात-वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यादृष्टीने मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयारी पूर्ण केली असून, आरे ते बीकेसी हा १२.४४ किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईकरांना या मार्गावरून आरे ते बीकेसी या प्रवासासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात असून, त्यावर एकूण २७ स्थानके असतील. या मेट्रो मार्गिकेचा पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी हा मार्ग सुरू होत असून, त्यावर एकूण दहा स्थानके असतील. सद्य:स्थितीत या मेट्रो मार्गिकेवर २४ गाड्या दाखल झाल्या आहेत. यातील नऊ गाड्या पहिल्या टप्प्यात मार्गावर धावणार आहेत. या मेट्रो गाड्यांची सीएमआरएस पथकाकडून नुकतीच तपासणी पूर्ण करण्यात आली असून, अंतिम मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर या आठवड्यात मेट्रो मार्गिकेच्या स्थापत्य कामाच्या आणि सुरक्षा यंत्रणेच्या तपासणीसाठी सीएमआरएस पथक दाखल होणार आहे. या पथकाकडून सुमारे तीन दिवसांत मार्गिकेची तपासणी पूर्ण होऊन लवकरच अंतिम प्रमाणपत्र मिळण्याची एमएमआरसीला अपेक्षा आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन एमएमआरसीने केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या मेट्रो मार्गिकेवरून दरदिवशी १३ लाख प्रवासी प्रवास करतील. यातून उपनगरीय रेल्वे मार्गिकेवरील १५ टक्के प्रवासी मेट्रोकडे वळतील, तर रस्त्यावरील वाहनांच्या दरदिवशीच्या ६.५ लाख फेऱ्या कमी होऊन ३.५४ लाख लिटर इंधनाची बचत होईल - अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका, एमएमआरसी 

दर ६.४ मिनिटांनी...

पहिल्या टप्प्यातील मार्गावर दर ६.४ मिनिटांनी मेट्रो गाडी धावणार आहे. यातून या मार्गावर नऊ मेट्रो गाड्यांच्या माध्यमातून दरदिवशी मेट्रोच्या ९६ फेऱ्यांद्वारे सेवा दिली जाणार आहे. मेट्रो तीन मार्गिकेवरील गाड्या चालविण्यासाठी ४८ चालक नेमण्यात आले आहेत. यातील दहा चालक महिला असतील.
 

Web Title: first phase of the Colaba to Seepz Metro 3 route will be opened for traffic during Navratri the first week of October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.