१६ जानेवारीला होणार लसीचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत बुधवारी कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा उपलब्ध झाला असून, १६ जानेवारीला पहाटे या साठ्याचे वितरण होणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात सव्वा लाख फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा डोस देण्यात येईल.
पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेला १ लाख ३९ हजार लसींचा साठा पुरेसा आहे. सव्वा लाख जणांना लस द्यायची असून, त्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस द्यायचा आहे. त्यानंतर लसीच्या डोसची मागणी आवश्यकतेनुसार केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. पहिल्या टप्प्यासाठी मुंबईत ९ लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. कूपर, नायर, केईएम, सायन, राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा, ट्रॉमा केअर आणि बीकेसी कोविड सेंटर या भागांमध्ये ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. यात ७२ युनिट असून सर्वाधिक १५ युनिट हे वांद्रे-कुर्ला कोविड केंद्र येथे आहेत.
लसीकरणाच्या ७२ युनिट्समध्ये १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात हाेईल. त्यातील सर्वाधिक १५ युनिट ही एकट्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सर्वाधिक लसीकरण हे येथेच होण्याची शक्यता आहे. दिवसाला किमान अडीच हजार जणांचे लसीकरण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, १० हजार लसींचे डोस ठेवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे वांद्रे कुर्ला कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले.
* यांना लस घेता येणार नाही
राज्यासह मुंबईत सुरुवातीला ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल. लस १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला तसेच गरोदर महिला आणि ज्यांना त्वचा अथवा इतर ॲलर्जी आहे अशा व्यक्तींना दिली जाणार नाही, अशा केंद्राकडून सूचना असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
............................