वाहतूक कोंडीवर उतारा; वसई-कल्याण-ठाणे अंतर्गत जल वाहतुकीच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 10:01 PM2018-04-24T22:01:56+5:302018-04-24T22:01:56+5:30
पर्यायी, स्वस्त आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना
मुंबई: ठाणे महानगरपालिका अंतर्गत वाढत जाणाऱ्या वाहतूक समस्येला पर्याय म्हणून पर्यायी, स्वस्त आणि पर्यावरणपूरक अंतर्गत जलवाहतुकीला मान्यता देण्यात आली आहे. वसई-ठाणे-कल्याण या 54 किमी लांबीच्या जलवाहतूक मार्गाला तसंच कोलशेत येथे मल्टीमोड ट्रान्सपोर्ट हब व 9 ठिकाणी जेट्टी बांधून अनुषंगिक सुविधा पुरविण्यास आज तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. या टप्प्याचा खर्च सुमारे 661 कोटी रुपये एवढा असणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
वसई, मिरा भाईंदर, घोडबंदर, नागला काल्हेर, अंजूर दिवे, पारसिक, डोंबिवली (ठाकुर्ली) व कल्याण या ठिकाणी जेट्टी बांधुन अनुषंगिक सुविधा पुरविणे प्रस्तावित आहे. हे काम जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट(जेएनपीटी), महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड (एमएमबी) आणि ठाणे महानगरपालिका (टीएमसी) यांनी एसव्हीपी बनूवन करावे, असे निर्देश देण्यात आले. याबाबतचा सविस्तर प्रकल्प आराखडा बनविण्याचे काम (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे.
वसई, मिरा भाईंदर, घोडबंदर, नागला काल्हेर, अंजूर दिवे, पारसिक, डोंबिवली (ठाकुर्ली) व कल्याण या भागातून ही जलवाहतूक होणार आहे. यामुळे रस्त्यावरिल रहदारीचा सुमारे 20 टक्के भार हलका होणार आहे. तर जलमार्गाचा वापर केल्याने 33 टक्के इंधन बचत आणि 42 टक्के प्रदूषणास आळा बसणार आहे. मेरी टाईम बोर्ड, ठाणे, मिरा- भाईंदर, वसई- विरार, भिवंडी - निजामपूर, कल्याण-डोंबिवली महानगर पालिका इत्यादी संस्थांची कंपनी स्थापन करुन त्यासाठी संयुक्त करार करुन प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्र हे एम एम आर रिजनच्या मध्यभागी असल्याने सध्या इथल्या वाहतुकीवर प्रचंड ताण आहे. मुंबई शहर, मुंबई पोर्ट ट्रस्ट व जे.एन.पी.टी इथून येणारी वाहतूक ठाण्यामधून पश्चिम द्रूतगती मार्गाने गुजरातकडे आणि पूर्व द्रूतगती मार्गाने नाशिक, मध्यप्रदेश, आग्र्याकडे जाते. त्यामुळे ठाणे शहरातच नव्हे तर लगतच्या मीरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी – निजामपूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई व मुंबई यामधील महापालिका क्षेत्रात वाहतूक कोंडी होते.