मुंबई : वायमॅक स्पोर्ट्स आयोजित पिकलबॉल महाइंटर क्लब स्पर्धा नुकतीच पार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन वाकोला परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (रजि.) संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू व सचिव डॉ.मोहन राणे यांच्या उपस्थितीत पार पडली.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ अग्रगण्य क्लबच्या संघांनी भाग घेतला होता. अतिशय चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या संघाने जळगाव संघाचा ४-१ने पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. याचबरोबर पहिल्यांदाच आयोजित झालेल्या महिलांच्या सांघिक सामन्यात टीम फ्युजन गर्लच्या संघाने बाजी मारली सदर स्पर्धेत अनन्या पाटील आणि वृषाली ठाकरे यांनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद खेचून आणले. सदर स्पर्धेचे यजमानपद यंदा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाने भूषविले आणि कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत सदर स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेसाठी भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांचे विशेष पाठबळ आणि मार्गदर्शन लाभले. पिकलबॉल खेळ तुलनेने नवीन असूनही दिवसेंदिवस या खेळाची लोकप्रियता वाढत आहे आणि म्हणूनच वायमॅक स्पोर्ट्स या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून अतिशय माफक दरात पिकलबॉल खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी वाय मॅक स्पोर्ट्सचे अध्यक्ष मकरंद येडूरकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशोधन देशमुख, निखिल मथुरे, अभिजित शिंदे, अमोल जोगळे, ऋषभ राऊत, राहुल घाणेकर, अभिषेक सावंत यांनी मेहनत घेतली.