दिवाळीच्या सुट्टीतही अभ्यासालाच पहिले स्थान; नवीन गोष्टी शिकण्याकडेही विद्यार्थ्यांचा कल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:02 AM2019-11-01T01:02:32+5:302019-11-01T01:02:49+5:30
या सर्वेक्षणात समाविष्ट मुंबईतील बहुतांशी म्हणजे ३६% मुले ही दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग आगामी सेमिस्टरच्या तयारीसाठी करतील,
मुंबई : सहामाही परीक्षा संपल्या की विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत काय करायचे याचे वेध लागतात. दिवाळी चार दिवसांची असली तरी सुट्टी मात्र चांगली १५ ते २० दिवसांची असते. त्यामुळे उर्वरित वेळेत निवडलेल्या करिअरला पोषक ठरेल, असा एखादा उपक्रम अथवा प्रशिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. पूर्वी इतके काटेकोर नियोजन नसायचे़ आता प्रत्येक दिवसाची नीट आणखी विद्यार्थी करू लागले आहेत. अर्थातच त्यात मौजमजा आणि पिकनिकसाठीही वेळ राखून ठेवलेला असतो. कुणी ट्रेकिंगला जात असते. एकूणच दिवाळीची सुट्टी छोटी असली तरी बहुतांशी विद्यार्थी पुढील अभ्यासाच्या तयारीसह नवीन भाषा, क्रीडा-संबंधित नवी कौशल्ये, आर्ट, क्राफ्ट कुकिंगसह विविध नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्या सुट्टीचा सदुपयोग करीत असल्याचे एका खाजगी संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासह यादरम्यान नवनवीन गोष्टी शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो, हे ब्रेनली या जगातील पीअर टू पीअर कम्युनिटीने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणात समाविष्ट मुंबईतील बहुतांशी म्हणजे ३६% मुले ही दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग आगामी सेमिस्टरच्या तयारीसाठी करतील, तर २७% पेक्षा जास्त मुले हा सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करून सुट्टीचा आनंद घेणार आहेत़ २१% पेक्षा जास्त मुले आपल्या कुटुंबीयांसह प्रवासाला जाणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुंबईतील ५५% पेक्षा जास्त विद्यार्थी या सुट्टीत ते अशा कामांमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवणार आहेत, ज्यामध्ये विविध विषयांचे संशोधन असून हे विषय अभ्यासक्रमाच्या बाहेरील असतील. ५५ % विद्यार्थ्यांनी आपल्याला आपले पालक मदत करणार असल्याचे सांगितले आहे. तर जवळपास ७२% मुलांचा फक्त त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सुट्टीसाठी जो अभ्यास दिला आहे, तो वेळेत पूर्ण करण्यावर भर असणार आहे. २०.८ % मुलांनी आपण खेळ आणि त्याच्यांशी निगडित कौशल्यांवर भर देणार असल्याचे म्हटले तर १९.६ % मुलांचा कल नवीन भाषा शिकण्यावर असणार आहे. १३.२ % विद्यार्थ्यांनी कला आणि हस्तकलेत रस दाखविला़
दिवाळीच्या सुट्टीचे दिवस कसे व्यतीत करायचे याबाबत प्रत्येक जण काही ना काही योजना आखत असतो. ही गोष्ट शाळकरी मुलांसाठीही तितकीच खरी आहे. ते या सुट्टीचा उपयोग मौज-मस्तीसाठी तर करतीलच; पण त्याचबरोबर आपली कौशल्ये, क्षमता अधिक धारदार करण्यासाठी, ज्ञान वाढविण्यासाठीदेखील ते आपला वेळ आणि ऊर्जा खर्ची घालतील. आमच्या सर्वेक्षणाद्वारे आम्ही विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि त्यांनी केलेल्या योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. - मिचल बोर्कोव्स्की, मुख्य कार्यकारी अधिकारी, ब्रेनली