शिवसेना-भाजपा व्यक्तिगत स्वार्थासाठी वाईट करणार नाहीत. राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत. भगवंताच्या कृपेने ती वेळ येईल आणि भविष्यात सगळे एकत्र येतील असा विश्वास शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केला आहे. संभाजी भिडे यांनी मंत्रालयात जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्या भेटीनंतर भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे मंत्रालयातून बाहेर पडत असताना एका महिला पत्रकाराला भिडेंनी कुंकू लावण्याचा सल्लाही दिला.
संभाजी भिडेंना मंत्रालयात महिला पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर, तू टिकली लाव. आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे, अन् आमची भारतमाता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असे म्हणत संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला परखड सल्ला दिला. संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते, त्यावेळी एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारण्यासाठी हातातील बूम भिडेंसमोर केला होता. त्यावेळी, संभाजी भिडेंनी आपल्या मनातील भावना अशा व्यक्त केल्या.
संभाजी भिडे पुढे बोलताना म्हणाले की, मी व्यक्तिगत स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाही. भगवंताच्या कृपेने आपल्याला चांगले मुख्यमंत्री लाभले. धाडसाने अनेक निर्णय घेतात. प्रत्येक निर्णय उत्कृष्ट घेतले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे विचार घेऊनच पुढे आले. शिवसेना-भाजपा व्यक्तिगत स्वार्थासाठी वाईट करणार नाही. राम लक्ष्मण एकत्र पाहिजेत. भगवंत त्यासाठी मदत करतोय. भविष्यात सगळे एकत्र येतील असं त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे अतिशय चांगली व्यक्ती
शिवरायांचा वारसा संपूर्ण देशात आहे. जिथे जिथे हिंदुत्वाला मानणारी सरकार आहेत त्याठिकाणी विचारांचा वारसा आहे. बाळासाहेबांची मूर्तिमंत प्रतिमा उद्धव ठाकरेंमध्ये आहे. अतिशय चांगली व्यक्ती आहे. राजकारणात हेलकावे खात नाव भरकटली आहे. त्यांच्या मनात नसताना हे घडलं आहे. ते दुरुस्त होईल असं वाटतं असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं.