ठाण्यात पहिले पोलीस पाळणाघर
By admin | Published: May 25, 2014 01:01 AM2014-05-25T01:01:39+5:302014-05-25T01:01:39+5:30
पोलीस दलात काम करणार्या पोलीस दाम्पत्यांच्या किंवा महिला पोलिसांच्या चिमुकल्यांचा सांभाळ करणेही त्यांच्यासाठी एक तारेवरची कसरत असते
पंकज रोडेकर, ठाणे - पोलीस दलात काम करणार्या पोलीस दाम्पत्यांच्या किंवा महिला पोलिसांच्या चिमुकल्यांचा सांभाळ करणेही त्यांच्यासाठी एक तारेवरची कसरत असते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलिसांच्या मुलांना सांभाळण्यासाठी पोलीस ‘पाळणाघराचे रोपटे’ रोवले जात आहे. अशा प्रकारे ‘पोलीस पाळणाघर’ सुरू करणारे शहर पोलीस दल हे जिल्ह्यात तरी पहिलेच ठरणार आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र हे ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट असे पसरले आहे. आयुक्तालयातील विविध विभागांत सुमारे ८ हजार ५०० अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये १५ टक्के महिला कर्मचारी आहेत. तसेच सुमारे ५ टक्के पोलीस दाम्पत्य आहेत. पोलीस दलात काम करताना त्यांना सरासरी १२ तास काम करावे लागते. हे काम करताना त्यांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी जणू तारेवरची कसरत करावी लागते. मग ते आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी एक तर घरीच मुले सांभाळणारी बाईची व्यवस्था करतात किंवा घराजवळच्या एखाद्या पाळणाघरात त्यांना ठेवतात. त्यामुळे मुलांच्या काळजीने व्याकूळ होताना दिसतात. ही बाब लक्षात घेऊन पोलीस पाळणाघर संकल्पना पुढे आली. त्याचे रोपटे शहरात रोवण्यात येणार आहे. त्यासाठी जागेचीही पाहणी करण्यात आली आहे. पाळणाघरातील मुलांच्या देखभालीसाठी तीन महिला पोलीस कर्मचारी आणि दोन मावशींना तैनात केले जाणार आहे. मात्र, अन्य साधनसामग्रीसाठी शासनदरबारी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास पाळणाघर लवकरच सुरू होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.